चाकरमानी विमानात तीन तास लटकले आणि घरी परतले

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून 1 सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू करण्याची घोषणा जिह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. त्यामुळे यंदा इमानातून इलंय… गणपती बाप्पा मोरया… म्हणत गावची वाट धरता येणार या आनंदात चाकरमान्यांनी विमानाचे तिकीट काढले. पण आसमान से गिरे अन् खजूर में अटके अशी अवस्था आज त्यांची झाली. कारण सकाळी 11.30 ला सिंधुदुर्गकडे झेपावण्यासाठी सज्ज असलेले विमान दुपारी 3 वाजले तरी उडालेच नाही आणि शेवटी अलायन्स एअरलाईन्सच्या विमानाचे उड्डाणच रद्द केल्याची बातमी प्रवाशांच्या कानावर येऊन आदळली आणि प्रवाशांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या नावाने बोटे मोडली.

 मुंबई ते सिंधुदुर्गला जाणारे अलायन्स एअरलाईन्सचे विमान गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास सज्ज होते. प्रवासीही वेळेवर दाखल झाले.मात्र तीन तास झाले तरी विमान जागचे हलले नाही. त्यामुळे संयम सुटलेल्या प्रवाशांनी अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अखेरीस विमानतळ प्रशासनाने या विमानाचे उड्डाणच रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला.