पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅण्टीनवर मुंडेंच्या टिमचा छापा; अस्वच्छतेची बजबजपुरी, उपाहारगृहाला सील ठोकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहावर झालेल्या धडक कारवाईची चर्चा अद्याप सुरू असतानाच एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात सुरू असलेल्या कॅण्टीनवर छापा मारला. ही कॅण्टीन विनापरवाना सुरू होती. कॅण्टीनमध्ये अस्वच्छतेची बजबजपुरी होती. त्यामुळे एफडीएच्या पथकाने या कॅण्टीनला सील ठोकले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅण्टीनवर झालेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील कॅण्टीनची अचानक तपासणी केली. या तपासणीत संबंधित कॅण्टीनकडे अन्न व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेला वैध एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी नसल्याचे उघड झाले. याशिवाय स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्न साठवण, अन्न हाताळणी आणि एकूण आरोग्यविषयक स्थिती अत्यंत असमाधानकारक असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

अन्न तयार करण्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या निकषांचे उल्लंघन करण्यात आलेले होते. त्यामुळे संबंधित कॅण्टीनचा अन्न व्यवसाय तत्काळ बंद करण्यात आला आहे. सर्व त्रुटी दूर केल्याशिवाय कॅण्टीन पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अन्न सुरक्षा व नागरिकांचे आरोग्य याबाबत शासनाकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विनापरवाना अन्न व्यवसाय तसेच स्वच्छता व अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया एफडीएचे सहाय्यक आयुक्त प्रवीण सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.