ऑलिम्पियन दहिया हरू शकतो, तर बजरंग-विनेश का नाही! दीपक पुनिया, अमन सहरावत यांनीही केला थेट एण्ट्रीला विरोध

बजरंग पुनिया आणि विनेश पह्गाट या स्टार कुस्तीपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट एण्ट्री दिल्यानंतर होत असलेला विरोध आता वाढत चालला आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्लूएफआय) अस्थायी समितीच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणाऱया दीपक पुनियाला आता अमन सहरावत याचीही साथ मिळाली आहे. 

कुस्तीच्या खुल्या चाचणी स्पर्धेत 57 किलो गटात अमन सहरावतने चीनमध्ये होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीट बुक केले. त्यानंतर तो म्हणाला, ऑलिम्पिक पदकविजेता रवि दहिया चाचणी स्पर्धेत पराभूत होऊ शकतो, तर बजरंग व विनेश  का नाही? चाचणी स्पर्धा न घेता कुठल्याही वजनी गटात एखाद्या कुस्तीपटूची थेट निवड करणे हे चुकीचे आहे. चाचणीतील अव्वल कुस्तीपटूचीच आशियाई स्पर्धेसाठी निवड व्हायला हवी, असे परखड मत दीपक पुनिया व अमन सहरावत या कुस्तीपटूंनी व्यक्त केले. मात्र, बजरंगविनेश यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील थेट एण्ट्रीला न्यायालयात आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आधीच फेटाळलेली आहे. 

आयओएने अखेर कुस्तीपटूंची नावे पाठविली 

हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱया कुस्तीपटूंची नावे अखेर रविवारी रात्री उशिरा पाठविली. आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करणाऱया संयोजन समितीने आयओसीला 23 जुलैपर्यंत कुस्तीपटूंची नावे पाठविण्यासाठी मुदत दिली होती. इतर क्रीडा प्रकारांतील खेळाडूंची नावे ही 15 जुलैपर्यंतच पाठवायची होती.