कामगार दिनानिमित्त गिरणी कामगारांचा मेळावा; कामगारांचा करणार सत्कार

गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवार 1 मे रोजी दादर पूर्वमधील मराठी ग्रंथ संग्रहालय इमारतीमधील सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे सकाळी 10.30 वाजता गिरणी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यभरातील लढाऊ कामगारांचा सत्कार केला जाणार आहे.

मेळाव्यात राज्य शासनाने गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासंबंधी जाहीर केलेल्या धोरणावर संघटनेची भूमिका, पात्रता निश्चिती अर्जाबाबत निर्णय, बोरिवलीतील खटाव मिलचा तिढा सुटून ती जमीन खटाव मिल विकासकाने मॅरेथॉनकडे ताबा दिला आहे तेव्हा या 40 एकर जमिनीबाबत पुढील रणनीती ठरवण्यात येईल तसेच एनटीसी गिरण्यांच्या जमिनी घरासाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून निर्णय घेतला जाईल. पनवेलमधील कोन गाव येथील घरांचा ताबा लवकर मिळावा आणि आकारण्यात आलेला अवास्तव देखभाल खर्च कमी व्हावा म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण घाग, सचिव प्रवीण येरुणकर, उपाध्यक्ष राजन दळवी, लक्ष्मण ओंबळे, वैशाली गिरकर, सहसचिव प्रकाश गोलतकर, सुलेखा राणा, अमोल धस तसेच अॅड. गायत्री सिंह, मीना मेनन, कॉ. विठ्ठल घाग, अॅड. विनोद शेट्टी, राजेंद्र भिसे, जगदीश नलावडे, सुहास बने, श्वेता दामले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.