
छत्रपती संभाजीनगर येथून 19 जणांचा समूह पर्यटनासाठी आज गणपतीपुळे येथे आला होता. त्यातील पोहण्यासाठी समुद्रात उतरलेले पाच जण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील हा समूह गणपतीपुळे येथे शुक्रवारी रात्री आला होता. ते देवदर्शन व पर्यटनासाठी खाजगी वाहनाने येथे आले होते. गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजिंगवर मुक्काम केल्यानंतर आज सकाळी गणपतीच दर्शन घेऊन त्यातील पाच जण समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात ओढले गेले. ही घटना लक्षात येताच किनाऱयावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने समुद्रात धाव घेत पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले.
बुडालेल्या पाच जणांमध्ये आदित्य राऊत (22), अनिकेत हिवराळे (20), आनंद नरवडे (20), प्रेम आदमाने (19) यश कांबळे (19) यांचा समावेश असून ते बीडकिंन, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर येथील आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक तटरक्षक दल आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने बुडालेल्या बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, सायंकाळी प्रेम आदमाने याचा मृतदेह सापडला आहे.





























































