हिंदुस्थानी उद्योग समूहांचे घोटाळे उघडकीस आणणार, अब्जोपती जॉर्ज सोरोसचा पाठिंबा असलेल्या गटाचा इशारा

अदानी समूहाने आर्थिक गडबड केली असल्याचा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने प्रसिद्ध केला होता. या अहवालानंतर हिंदुस्थानात मोठी खळबळ उडाली होती. या अहवालाचा अदानी समूहाच्या समभागांवरही परिणाम झाला होता. या हिंडेनबर्ग रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणेच एका समूहाने हिंदुस्थानातील उद्योग समूहांनी केलेले आर्थिक घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. या समूहाला अब्जोपती जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांसारख्यांचा पाठिंबा मिळालेला आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीआरपी) असं या संस्थेचं नाव आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

OCCRP हा समूह म्हणजे शोध पत्रकारांचे जगभर पसरलेले एक जाळे आहे. गुन्हे आणि भ्रष्टाचारांची प्रकरणे उघडकीस आणणे हे या संस्थेचे काम आहे. जनतेची फसवणूक होऊ नये, त्यांचे हक्क अबाधित राहावेत हा आपला उद्देश असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. ही संस्था हिंदुस्थानातील काही कंपन्यांबाबतचे शोध प्रकाशित करण्याच्या तयारीत असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. या शोधामध्ये हिंदुस्थानातील कंपन्यांचे समभाग आणि उपकंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या परदेशी गुंतवणुकीवरही प्रकाशझोत टाकला जाण्याची शक्यता आहे. ही संस्था कोणत्या कंपन्यांबाबत खुलासे करणार आहे हे कळू शकलं नसलं तरी तपास यंत्रणा भांडवली बाजारावर नजर ठेवून आहेत.

OCCRP ने त्याच्या वेबसाइटवर आपल्याला सढळ हाताने मदत करणारे म्हणून स्वत:ला समाजसेवक म्हणवणारे जॉर्ज सोरोस आणि त्यांची संस्था ओपन सोसायटी फाउंडेशन हे असल्याचे म्हटले आहे. याशिवाय या संस्थेला फोर्ड फाऊंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि ओक फाऊंडेशन यांनीही मदत केली आहे.

जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर आर्थिक गडबड केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. या पडझडीमुळे या समूहाला बरेच आर्थिक नुकसान झाले होते. हा आर्थिक फटका बसल्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील गौतम अदानी यांचे स्थान रिलायन्स समूहाच्या मुकेश अंबानी यांनी घेतले होते.

हिंडनबर्गने अदानी समूहावर केलेल्या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झाला होता, जॉर्ज सोरोस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समूहावरील आरोपांबाबत परदेशी गुंतवणूकदार आणि संसदेच्या “प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील”. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार टीका केली होती ज्यात जॉर्ज सोरोस यांनी केवळ पंतप्रधान मोदींवरच हल्ला केला नाही तर भारतीय लोकशाही व्यवस्थेलाही लक्ष्य केले आहे असा आरोप भाजपने केला होता.

अदानी समूहावरील आरोपांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) मार्फत चौकशी केली जात आहे. त्यांनी या प्रकरणाचा अंतिम अहवाल तयार केला असून तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. 14 ऑगस्ट रोजी हा अहवाल सादर करणे अपेक्षित होते, मात्र , सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी 15 दिवसांची वाढ दिली होती.