पाकिस्तानची कसोटीवर पकड

पहिल्या कसोटीत 4 विकेटस्ने विजय मिळवणाऱया पाकिस्तानने दुसऱया आणि अखेरच्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव 48.4 षटकांत 166 धावांत गुंडाळला आणि त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. तोपर्यंत पाकिस्तानने 28.3 षटकांत 2 बाद 145 अशी दमदार मजल मारत दुसऱया कसोटीवर आपली पकड पहिल्याच दिवशी मजबूत केली. पाकिस्तानला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी आता केवळ 21 धावांची गरज आहे.  श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि पाकिस्तानच्या नसीम शाह आणि अबरार अहमद यांनी लंकन डावाला एकापाठोपाठ धक्के देत 166 धावांवरच गुंडाळले. लंकेकडून धनंजया डिसिल्वाने एकमेव अर्धशतकी खेळी केली. अबरारने 69 धावांत 4 विकेट घेत लंकेचा डाव 48.4  षटकांतच संपवला. त्यानंतर अब्दुल्ला शकीफ आणि शान मसूदने दुसऱया विकेटसाठी 108 धावांची भागी रचून पाकिस्तानला कसोटीवर वर्चस्व मिळवून दिले. असिथा फर्नांडोने पाकच्या दोन्ही फलंदाजांना बाद केले. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा शफीक 74 तर कर्णधार बाबर आझम 8 धावांवर खेळत होते.