धनलाभ व्हावा म्हणून तरुण मुलीवर पेट्रोल ओतून जाळले, तरीही मृत्यू न झाल्याने घरात कोंडले

अचानक धनलाभ व्हावा यासाठी एका महिलेने आपल्या तरुण मुलीला पेट्रोल ओतून जाळल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरातील फुलेनगर परिसरात ही घटना घडली आहे. पार्वती हलमुख (40 वर्षे) असं आरोपी महिलेचे नाव असून सुप्रिया हलमुख( 20 वर्षे) असं तिच्या मुलीचे नाव आहे. मुलीला ठार मारलं तर आपल्याला धनलाभ होईल या अंधश्रद्धेपोटी पार्वतीने आपल्या मुलीला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जाळल्यानंतरही सुप्रियाचा मृत्यू न झाल्याने पार्वती भडकली होती. यामुळे तिने सुप्रियाला 5 दिवस घरातच डांबून ठेवले होते अशी धक्कादायक बाबही पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

पार्वतीला जादूटोणा करणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीने धनलाभ व्हावा असं वाटत असेल तर आपल्या मुलीला ठार मार असं सांगितलं होतं. शकुंतला आहेर असं या मैत्रिणीचं नाव आहे. तिने दिलेल्या सल्ल्यानुसार पार्वतीने आपल्या मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पार्वतीच्या नवऱ्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून पार्वती तिचा मुलगा आणि सुप्रिया असे तिघेजण घरात राहात होते. आपल्याला झटपट पैसा मिळावा अशी पार्वतीचे स्वप्न होते. तिचा गैरफायदा उचलत तिची मैत्रीण शकुंतलाना तिला अघोरी उपाय सांगितला होता. कालपरवा भेटलेल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून पार्वतीने सुप्रियाला पाठचा पुढचा विचार न करता जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीसही हादरले आहेत. “तू जर तुझ्या मुलीला जिवंत जाळून मारले तर तुला चांगला धनलाभ होईल आणि तुझ्या मुलाचेसुद्धा चांगले होईल” असं शकुंतलाने पार्वतीला सांगितले होते. सुदैवाने सुप्रिया बचावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.