
पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 23 मधील रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
दादर स्टेशन फुटपाथवर राहणारा रुग्ण प्रभुराम (75) यांना कुणी नातेवाईक नसल्याने जुबेर अन्सारी यांनी 24 जुलै रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीचे अहवाल नॉर्मल होते. पालिकेकडून उपचार सुरू असल्याने त्यांची प्रकृतीही स्थिर होती. त्यांची मानसिक स्थितीही स्थिर होती. मात्र त्यांनी 26 जुलै रोजी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. या घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.
आयुक्तांकडे चौकशीची मागणी
घटनेच्या कालावधीत डॉ. अविनाश जाधव हे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती असतानाही त्यांनी डय़ुटी पूर्ण होण्यापूर्वी रुग्णालय सोडले. डॉ. अविनाश जाधव यांच्या संदर्भात यापूर्वीही डय़ुटीमध्ये निष्काळजीपणा केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे समजते. या सर्व बाबींचाही चौकशीत समावेश करण्यात यावा, असे पत्र अश्विनी भिडे यांना देण्यात आले आहे. रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी ‘एसओपी’ तयार करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.





























































