एक नवी सुरुवात…वजन कमी करण्याचा संकल्प करा यशस्वी

सर्वेक्षणानुसार, नवीन वर्षाचे संकल्प केलेल्या लोकांना वजन कमी करायचे असते. नवीन वर्षाचे 80 टक्के संकल्प पहिल्या महिन्यातच अयशस्वी होतात. वजन कमी करण्याचा संकल्प का अयशस्वी होतो हे आता आपण बघू. त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत…

अवास्तव अपेक्षा
अवास्तव उद्दिष्टे ठेवल्याने निराशा आणि अपयश येऊ शकते आणि शिवाय ते आरोग्यदायीही नाही. आठवडय़ातून अर्धा ते एक किलो वजन कमी करण्यासारखे वास्तववादी ध्येय निश्चित करण्याबद्दल वैद्यकीय माहितीगार किंवा आहारतज्ञ यांच्याशी बोला.

नियोजनाचा अभाव
नुसतेच वजन कमी करायचे असे ठरवून चालणार नाही. तुमची दिनचर्या बदला. जेवणाचे नियोजन, स्वयंपाक, घरी व्यायाम करणे किंवा जिममध्ये जाण्यासाठी वेळ ठरवा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय करायचेय त्याचा आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे आवश्यक.

प्रेरणेचा अभाव
जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रेरणा असणे आवश्यक आहे. तुम्हाला वजन का कमी करायचे आहे याचा विचार करा. कदाचित तुम्हाला तुमच्या मुलांसोबत खेळण्यासाठी अधिक ऊर्जा हवी असेल किंवा तुमच्या पुढच्या सुट्टीत गिरनार पर्वत किंवा हिमालयावर ट्रेक करत चढून जायचे आहे…वगैरे. तुम्हाला प्रेरणा देणारे काहीतरी कारण शोधा.

आधाराचा अभाव
तुम्हाला जे काही ध्येय निश्चित करायचे आहे, ते तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. रोज टेकडीवर जायचे आहे आणि तुमच्यासारखाच आरोग्यावर काम करायचे अशी एखादी मैत्रीण किंवा मित्र शोधा. तुमच्या दांडय़ा कमी होतील.

पावलापावलांवर घसरण्याचा धोका
काही वेळा ध्येयावरून घसरणे, जसे की एक दिवस व्यायामशाळा वगळणे किंवा नको ते खाणे संपूर्ण संकल्प विस्कळीत करू शकते. प्रत्येकजण चुका करतो आणि एकदम आपली जीवनशैली बदलणे कठीण आहे. स्वतःवर खूप कठोर होण्याऐवजी किंवा हार मानण्याऐवजी दुसऱया दिवशी परत गाडी रुळावर आणा.

आरोग्य ध्येय याप्रमाणे…
वजन कमी करा आणि ते परत वाढू न देणे
वजन कमी करण्याचा संकल्प हा तुम्ही चांगल्या आरोग्यासाठी उचलू शकता अशा सर्वात महत्त्वाच्या पायऱयांपैकी एक आहे. तुमच्या शरीराचे वजन फक्त पाच ते दहा टक्के कमी केल्याने तुम्हाला हृदयविकार, टाइप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य स्थितीचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

सकस आहार घेणे
फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरी आणि चरबी कमी असते, फायबर जास्त असते आणि जीवनसत्त्वे व खनिजांचे भरपूर स्रोत असतात. फायबर असलेले अन्न तुम्हाला पोट भरून ठेवते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

सावकाश खा
खूप जलद खाल्ल्याने तुम्ही जास्त खाण्यास कारणीभूत ठरू शकता. म्हणून प्रत्येक चावा काळजीपूर्वक चावा. टीव्ही बंद करा, तुमचा फोन दूर ठेवा आणि जेवणाच्या स्वादांचा आनंद घ्या.

कमी बसा, जास्त हालचाल करा
आपल्या दैनंदिन जीवनात फक्त अधिक सक्रिय राहण्याचा संकल्प करणे अधिक चांगले आहे. सक्रिय होण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कमी बसणे आणि जास्त हालचाल करणे. किराणा दुकानाच्या प्रवेशद्वारापासून गाडय़ा दूर पार्क करा, लिफ्टऐवजी पायऱया घ्या आणि तुम्ही टीव्ही पाहता तेव्हा व्यायाम करा.

तणाव कमी करण्यासाठी पावले उचला
तुमचा तणाव नियंत्रणाबाहेर जात असल्यास श्वासोच्छ्वासाच्या व्यायामाचा सराव करणे, फिरायला जाणे किंवा संगीत ऐकणे यांसारख्या साध्या गोष्टी तुमच्या जीवनात शांतता आणण्यास मदत करू शकतात. दीर्घकालीन ताणतणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करतात, त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी निरोगी मार्ग अवलंबा.

पुरेशी झोप घ्या
चांगल्या दर्जाची झोप तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुमच्या मनाला विश्रांती व रिचार्ज करण्यासाठी वेळ देऊन भावनिक निरोगीपणाला प्रोत्साहन देते.

अर्चना रायरीकर, आहारतत्ज्ञ