नगरचे प्रमोद कांबळे साकारणार अयोध्येतील प्रदक्षिणा मार्गावरील शिल्प चित्राचे 3D मॉडेल

मिलिंद देखणे नगर

अयोध्येतील राम मंदीर लवकरच पूर्ण होणार आहे, या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणतील शिल्प चित्र दाखवण्यात येणार आहे, त्या प्रसंगाचे थ्रीडी मॉडेल तयार करण्याचे काम नगरचे प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांना मिळाले असून सध्या नगरमध्ये या मूर्तीचे काम अतिशय वेगाने सुरू आहे, या कामामुळे आता त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नगरचे कलाकार असलेले प्रमोद कांबळे यांनी अतिशय मेहनतीने चित्रकलेचे काम सुरू केले. आज त्यांचे काम जिल्ह्यात ,राज्यात नाही तर देश पातळीवर गाजते आहे. प्रमोद कांबळे यांना अनेक  पुरस्कारही मिळालेले आहेत. अतिशय मेहनतीने व जिद्दीने एकाग्रपणे आपली कला चित्राच्या माध्यमातून त्यांनी साकारली आहे, केवळ 1 मिनिटामध्ये पेन्सिल चित् काढण्याचे कौशल्य प्रमोद कांबळे यांच्याकडे असून हा सुद्धा एक प्रकारे रेकॉर्डच म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील हजारो शिल्पकृती त्यांनी  तयार केल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या शिल्पकृतींची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.

सध्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे काम सुरू झालेले आहे, हे काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. या कामाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत. बांधकामाबरोबरच या ठिकाणी शिल्पकृती उभारण्याचेही काम सुरू  आहे. या शिल्पकृतींसाठी स्वतंत्र समिती आहे. यामध्ये दिग्गज शिल्पकार आणि वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी कार्यरत आहे. मंदिरामध्ये काही शिल्पकृती उभारल्या जाणार असून त्या प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात येत आहेत. दगडापासून तयार करण्यात येणाऱ्या या शिल्पाच्या माध्यमातून रामायणातील महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात येणार आहे. या शिल्पांसाठीचे चित्र प्रमोद कांबळे यांनी रेखाटले असून शिल्पाचे थ्रीडी मॉडेलही त्यांनी घडवण्यास सुरुवात केली आहे.मातीची थ्रीडी शिल्प सध्या प्रमोद कांबळे घडवत असून ती झाली की, जयपूर व राजस्थानला पाठवण्यात येणार आहे. मातीच्या शिल्पाप्रमाणे तिथे दगडांची शिल्पे बनविण्यात येणार आहेत. “हे काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, या कामांसाठी  एकाग्रतेची फार आवश्यकता असते. माझ्यावर असलेली जी जबाबदारी फार मोठी असून ती नीटपणे पार पाडणे हे महत्त्वाचे आहे.राम मंदिरासाठी अशा प्रकारचे शिल्प घडविण्याचे भाग्य मला मिळाले याचे मला फार समाधान आहे.” अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी दिली आहे.