
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल) दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आशाताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘आशा भोसले यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. आशाताई या अद्वितीय आणि अष्टपैलू आवाजाच्या धनी होत्या. या आवाजाने जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य केलं. भावगीत असो की अवखळ आणि लडिवाळ गीतरचना, त्यांची स्वरप्रतिभा कालातीत होती. संगीत क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला. त्यांचा स्वर रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहील व पुढील पिढय़ांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.
कधीही भरून न येणारी हानी! – द्रौपदी मुर्मू
‘‘आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक दिग्गज गायिका म्हणून त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीने हिंदुस्थानी संगीताचा एक संपूर्ण कालखंड व्यापला. एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या अटींवर त्या आयुष्य जगल्या. आपल्या सुमधुर आणि कालातीत आवाजाने त्यांनी हिंदुस्थानी संगीत समृद्ध केले. त्यांचे निधन ही संगीतप्रेमींसाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करते,’’ अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या.
एका सुवर्णयुगाला विराम मिळाला – शरद पवार
आशा भोसले यांच्या निधनाने हिंदुस्थानी संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या. आशाताईंनी संगीतविश्वासाठी सहा दशकांहून अधिक काळ दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सुरांची सुंदर बाग उजाड झाली – देवेंद्र फडणवीस
पार्श्वगायिका, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला. सुरांची एक सुंदर बाग आज उजाड झाली, अशा शोकमग्न भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता, गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. त्याबरोबरच आशाताईंबरोबरच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे – सचिन तेंडुलकर
आजचा दिवस केवळ भारतासाठीच नाही, तर जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशाताई म्हणजे केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर त्या आमच्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग होत्या. आज जे दुःख होत आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. काळ जणू थांबला आहे असे वाटतेय. पण त्यांची अजरामर गाणी त्यांना कायम आमच्यात जिवंत ठेवतील. धन्यवाद ताई, आमचे आयुष्य तुमच्या सुरांनी आणि प्रेमाने समृद्ध केल्याबद्दल. तुमची खूप आठवण येईल, अशा भावना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्या

























































