फक्त पोलीस निरीक्षक, एपीआय जबाबदार कसे? पोलीस उपायुक्त, एसीपींवर वरदहस्त कशासाठी?

पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातप्रकरणी वरिष्ठांना वेळेत माहिती न देणे आणि तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. प्रत्यक्षात मात्र घटनेच्या दिवशी रात्रपाळीला ऑनड्युटी असलेले पोलीस उपायुक्त आणि सहायक उपायुक्तांची काहीच जबाबदारी नव्हती का, पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत वरिष्ठांनी पुन्हा एकदा बळीचा बकरा केल्याची चर्चा पुणे पोलीस दलात रंगली आहे.

पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित केलेल्या दोघांची नावे आहेत. अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्याची घटना रविवारी (दि. 19) मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये घडली. अपघाताची माहिती वरिष्ठांना न दिल्याबद्दल आणि या घटनेचा गांभीर्यपूर्ण तपास न केल्याचा ठपका ठेवत येरवडा ठाण्यातील निरीक्षकासह सहायक निरीक्षकाला निलंबित केले. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले. दरम्यान, त्यादिवशी रात्रपाळीला असलेले पोलीस उपायुक्त यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील घटनांची नेमकी कोणती माहिती घेतली. नाईट राउंड, अधिकाऱ्यांची ड्युटी संपण्यापूर्वी अपघाताचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तरीही एवढ्या गंभीर अपघाताची पुसटशीही कल्पना संबंधितांना का आली नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

भयंकर अपघात घडूनही प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसह कंट्रोल रूमला माहिती दिली नाही. त्यामुळे रात्रपाळीच्या अधिकाऱ्यांना याबाबत काहीच समजले नाही, असा निष्कर्ष काढून आता चौकशी केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र पुणे पोलिसांना कोणत्याही घटनेचे गांभीर्य कधी येणार आहे. विशेषतः काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती सदाशिव पेठेत कोयताधारी तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यावेळी चौकीत पोलीस नसणे, अपघातात दोघा अभियंत्यांचा जीव गेल्यानंतरही किरकोळ घटनेप्रमाणे वागणे, अशा अनागोंदी कारभारामुळे पुणे पोलिसांची नागरिकांमधील इभ्रत ढासळत चालली असल्याचे दिसून येत आहे.