बोगस पासपोर्टवर थायलंडला जाणाऱया बांगलादेशी नागरिकाला अटक 

बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मुंबईहून थायलंडला जाणाऱया बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. आपु बरूआ असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

आपु हा शनिवारी थायलंडहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या पासपोर्टची तपासणी केली. त्याला पुणे कार्यालयातून पासपोर्ट दिला होता. विमानतळ अधिकाऱयांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्याचे जन्मस्थान हे कोलकाता असल्याचे त्याने सांगितले, मात्र भाषेवरून तो बांगलादेशी नागरिक असावा असा विमानतळ अधिकाऱयांना संशय आला. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले.

आपु हा दोन वर्षांपूर्वी हिंदुस्थानात आला होता. कोलकाता येथे राहणाऱया एका एजंटच्या मदतीने त्याने 50 हजार रुपयांत बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून पासपोर्ट बनवला. पुण्यात तो एक वर्ष राहिला होता. 17 एप्रिलला तो मुंबईहून तो थायलंड येथे गेला. शनिवारी तो थायलंडहून पुन्हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. बोगस पासपोर्टप्रकरणी त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. इमिग्रेशन अधिकाऱयाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आपुविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.