देशातले 75 जज लंडनला पिकनीकसाठी जातात तर मीनाक्षी नटराजन, ममता बॅनर्जी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना न्याय कसा मिळणार? संजय राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातले 75 जज लंडनला पिकनीकसाठी जातात तर मीनाक्षी नटराजन, ममता बॅनर्जी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना न्याय कसा मिळणार? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच हे लोक दरोडा घालून निवडणुका जिंकत आहेत. आणि हे स्वतःला निवडुन आलेले पंतप्रधान म्हणतात, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये असताना विधानसभा निवडणुकीत फॉर्म भरताना कुठेही लग्न झाल्याचा उल्लेख केला नव्हता. ही गंभीर बाब होती. तरी त्यांचा फॉर्म स्विकारला गेला. पण मीनाक्षी नटराजन या प्रामाणिक महिला आहेत, त्यांचा फॉर्म कुठल्या आधारावर रिजेक्ट करण्यात आला? परिमल नाथवानी आमचे मित्र जे झारखंडमधून लढत आहेत. त्यांना रिटर्निंग अधिकारी 24 तासांची मुदत देतात चुका दुरुस्त करण्यासाठी. अशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जाता. चंडीगढच्या निवडणुकांचे काय झालं हे सगळ्यांनाच माहित आहे. या प्रकारे हे लोक दरोडा घालून निवडणुका जिंकत आहेत. आणि हे स्वतःला निवडुन आलेले पंतप्रधान म्हणतात? असे संजय राऊत म्हणाले.

ज्या देशाचा मुख्य न्यायाधीश सरकाच्या मंत्र्यांसोबत लंडनला पिकनीकला जातात. त्या देशाकडून आणि न्यायव्यवस्थेकडून काय अपेक्षा करणार? आणि त्या आधारावरच मोदी पंतप्रधान पदावर टिकलेले आहेत. आमचा शिवसेनेचा खटला गेली 4 वर्ष प्रलंबित आहे. 75 जज जनतेच्या पैश्यातून लुटमार करून लंडनला पिकनीक करायला आणि बॅडमिंटन खेळायला गेले होते. असं असेल तर मीनाक्षी नटराजन, ममता बॅनर्जी, शरद पवार यांना कसा न्याय मिळणार? शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना कसा मिळणार? न्याय मागून मागून आम्ही थकलो. अशा भ्रष्ट व्यवस्थेत मोदी पंतप्रधानपदावर राहतात तर मोदी हे निवडून आलेले पंतप्रधान नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

नीट प्रकरणी काँग्रेसने देशभरात आंदोलन केले आहे. पण माध्यमं दाखवत नाहीत. या देशातले राजकीय पक्ष, संघटना आपल्या लढाया लढायला सक्षम आहेत. तरुणांनी नीट प्रकरणी जी भूमिका घेतली त्याला आमचा पाठिंबा आहे. पण या आंदोलनाच्या माध्यमातून जर कोणी सरकारला मदत करत असेल त्यावर आमचे लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.