महाराष्ट्र मणिपूरच्या दिशेने चालला आहे की काय ? पत्रकार मारहाणीवर संजय राऊत यांचा सवाल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चमकोगिरी करत असल्याचा आरसा दाखवून देणाऱ्या पत्रकारावर जळगावमधील पाचोऱ्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ही कोणत्या प्रकारची दादागिरी आहे असा सवाल विचारतानाच राऊत यांनी महाराष्ट्र मणिपूरच्या दिशेने चालला आहे की काय, असा प्रश्न निर्माण व्हायला लागल्याचे म्हटले आहे.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांना महाराष्ट्रात भाजप राहुल गांधी यांनी दिलेल्या फ्लाईंग किसविरोधात आंदोलन करणार असल्याबद्दलचा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, जंतर मंतरला महिला कुस्तीपटू बसल्या होत्या तेव्हा भाजपचे कोणी तिथे का गेले नाही? राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादूची झप्पी असते तसा जादूका फ्लाईंग किस त्यांनी दिला. मोहब्बतच्या दुकानातील ते एक महत्त्वाचे शस्त्र आहे. ज्यांना प्रेमाची सवय उरलेली नाही, ममत्व उरलेले नाही अशांना हे फ्लाईंग किस काय आहे हे कळणार नाही.

संजय राऊत यांची शिवसेनेच्या पॉडकास्ट अर्थात आवाज कुणाचामध्ये सविस्तर मुलाखत घेण्यात आली आहे. याचा एक प्रोमो प्रसिद्ध झाला असून यातील त्यांच्या ‘ईडी ही दहशतवादी संघटना आहे’ एका वाक्याबाबतही राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “ज्या गोष्टींचा तपास पोलीस , राज्याचा आर्थिक गुन्हे विभाग करू शकतो तिथे ईडी घुसवायची आणि केंद्र सरकारने त्यावर नियंत्रण ठेवायचं आणि विरोधकांना दडपशाहीच्या मार्गाने आपल्याकडे खेचायचे असे प्रयत्न सुरू आहे. हे पाहिले तर अनेक केंद्रीय तपास यंत्रणा या दहशतवाद करत आहे. हे मी सांगत नसून हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. ईडीला आवरले नाही तर देशात अराजक निर्माण होईल असे साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. “