मोदी-शहा देशभरात निवडणूक प्रचारात दंग, जम्मू – कश्मीरात हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला, 1 जवान शहीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा देशभरात लोकसभा निवडणूक प्रचारात दंग असतानाच जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. आज पुंछ जिह्यात हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱया ताफ्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करीत हल्ला केला. यात 1 जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत.

पुंछमधील सुर्णकोट परिसरात दहशतवादी हल्ला झाला. हवाई दलाच्या जवानांना घेऊन सणाई टॉप येथे लष्कराची दोन वाहने जात होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. पाच जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उधमपूर येथील कमांड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला.

सर्च ऑपरेशन सुरू

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच दहशतवादी हल्ला झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी अलर्ट झाली आहे. गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. लष्कर, हवाई दल आणि निमलष्करी दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ले थांबल्याच्या वल्गना

370 कलम हटविल्यापासून जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले थांबल्याच्या वल्गना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा आणि भाजपकडून वारंवार करण्यात येतात. लोकसभा निवडणूक प्रचारात हा मुद्दा मतांसाठी मांडण्यात येतो. काल अमित शहा यांनी रत्नागिरीतही हाच दावा केला. परंतु जम्मू-कश्मीरातील दहशतवादी हल्ले पूर्णपणे थांबलेले नाहीत हे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे.