भटकंती – अनोखी परंपरा ट्रान्सजेंडर समुदायाचा मोठा उत्सव

>> वर्षा चोपडे

आपल्या हिंदुस्थानात मंदिरांबाबत विविध प्रकारच्या परंपरा व समजुती आहेत आणि त्यांचे पूर्ण भक्तिभावाने पालनही केले जाते. मग ते मंदिरात पशुबळी देण्याची, पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेण्याची अथवा दारू अर्पण करण्याबाबतची रीत असो किंवा एका विशिष्ट वयापेक्षा जास्त स्त्रियांना मंदिरात जाण्यास बंदी असो. हिंदू शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो. सत्य हे आहे की, प्रथा म्हणून अनेक चुकीच्याही परंपरा आपण पाळतो. त्या कालबाह्य व्हायला हव्यात. देवाला खुश करण्याचे अनेक गैरप्रकारही बघायला मिळतात. आपण सगळे देवाची लेकरे आहोत. देव कुणावरही क्रोधित होत नाही. कर्म तसे फळ असते हे नक्की. असेच एक पारंपरिक प्रथा जपणारे अप्रतिम मंदिर केरळच्या ‘कोल्लम’मध्ये आहे. एक अतिशय अनोखी परंपरा इथे पाळली जाते. मार्च महिन्यातील कोट्टनकुलंगरा चमायाविलक्कू अर्थात दिव्यांचा आनंदोत्सव! हा उत्सव बघण्यासाठी अनेक पर्यटक या स्थळाला भेट देतात.

कोल्लम रेल्वे स्टेशनपासून सुमारे 13 किमी आणि त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कोल्लमपासून सुमारे 71 किमी असलेले कुरुथोला पंथल म्हणजे कोमल नारळाच्या पानांपासून बनवण्याची कला तिथे आहे. कोट्टनकुलंगरा देवी मंदिरातील एक विशेष उत्सव कोट्टनकुलंगरा चमायाविलक्कू म्हणजेच दिव्यांचा आनंदोत्सव, केरळच्या परंपरा व प्राचीन संस्कृतीची आठवण करून देतो. ज्या ठिकाणी मंदिर आहे तो भूखंड एकेकाळी जंगलाचा भाग होता. तिथे झाडे, वनस्पती आणि जंगली प्राणी असत. दाट झाडीने वेढलेला हा प्रदेश शांत होता. या भागात पूर्वेला मोठा विस्तीर्ण खोल तलाव होता. पावसाळ्यात हा तलाव पाण्याने तुडुंब भरून जातो. त्यामुळे आजूबाजूचा परिसर सुपीक आणि शेतीयोग्य बनला आहे. जुने लोक असे म्हणतात की, पुरातन काळात भुतकुलमच्या दक्षिण भागातील जागा हिरव्या चाऱयाने व भरपूर पाण्याने भरलेली असल्याने शेजारच्या गावातील गायी पाळणारे गुराखी आपल्या गुरांना चारा मिळावा म्हणून येथे घेऊन येत असत. एकदा त्या गुराख्यांना नारळ फोडायचे होते. त्यामुळे त्यांनी शेजारच्या दगडावर तो नारळ आपटला, पण काय आश्चर्य! त्या दगडांमधून रक्त यायला लागले. गुराखी गावाकडे धावले आणि त्यांनी हा प्रकार गावातील सरपंचाला सांगितला. त्यानंतर काही बालिकांनी फुलांच्या माळा आणून देवीचे ते स्वरूप समजून पूजा करायला सुरुवात केली. पुरुषांनीही सोळा शृंगार करून पूजा केली तर देवी पावते ही श्रद्धा दृढ झाली आणि ही परंपरा सुरू झाली. आजही कित्येक देवभोळे पुरुष स्त्राr रूपात सोळा शृंगार करून आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून येथे पूजा करतात.

प्रत्येक मंदिराच्या उत्सवाप्रमाणे कोल्लममधील श्री कोट्टनकुलंगारा देवी मंदिराच्या चमायाविलक्कूमध्ये स्त्रियांच्या वेशातील सुंदर पुरुष व ट्रान्सजेंडर हातात दिवे घेऊन मिरवणूक काढतात. या खास महोत्सवात अनेक पुरुष सुंदर स्त्राr वेष धारण केलेले येथे पाहायला मिळतात. येथील उत्सव 19 दिवस चालतो. थिडंबू म्हणजे देवीची मूर्ती वाहून नेणारा राक्षस टोकर रात्रभर बघू शकतो. हा सण केरळमधील ट्रान्सजेंडर समुदायाचा सर्वात मोठा उत्सव बनला आहे. केरळच्या बहुतेक मंदिरांच्या उत्सवांप्रमाणे कोट्टनकुलंगारामध्येही फटाक्यांच्या अतुलनीय आतषबाजीने आकाश लखलखते.

आपला देश अत्यंत सुंदर आहे प्रत्येक राज्याची विशेष खासीयत आहे. शनी शिंगणापूरच्या मंदिराबातही अशीच दंतकथा आहे. निसर्ग विस्मयकारक आणि चमत्काराने भरलेला आहे. जगात असेही दगड असतील का, की ज्यांना टोचले की रक्त येत असेल? असे प्रश्न मनाला पडतात. सत्यम, शिवम, सुंदरम देश अशी ओळख असलेला आपला देश आणखी सुजलाम सुफलाम कसा होईल याचा विचार करणे नक्कीच गरजेचे आहे. यात प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे.
देशातील पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवा. फिरायला गेलात तर प्लास्टिक आणि इतर कचरा कचरा कुंडीत टाका. विदेशी पर्यटकांशी आदराने वागा आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या. आपला देश आणि आपले विचार सुंदर ठेवले तरच खूप विदेशी पर्यटक येतील.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)
[email protected]