पश्चिम बंगालचे राज्यपाल बोस यांच्या अडचणीत वाढ; विनयभंगाच्या चौकशीसाठी विशेष पथक

Bengal Governor CV Ananda Bose

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली आहे. या गंभीर आरोपाच्या चौकशीसाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. पथकाने राजभवन प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहेत. राज्यपाल बोस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

चौकशी पथकात आठ पोलीस अधिकार आहेत. या पथकाचे प्रमुख डीसीपी आहेत. विनयभंगाच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन झाले असतानाच राजभवन प्रशासनाने पोलिसांना प्रवेशबंदी केली आहे. या घटनेच्या काही साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

या घटनेमुळे पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच तापले आहे. संदेशखली घटनेत महिला सुरक्षेच्या बाता मारणारे आता कुठे आहेत, असा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपाल बोस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पदावर असताना कारवाई होत नाही

राज्य घटनेतील अनुच्छेद 361 नुसार राज्यपाल पदावर कार्यरत असणाऱया व्यक्तीवर कारवाई करता येत नाही.

मोदी गप्प का आहेत?

संदेशखली येथील महिलांवर अत्याचाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली होती, मग राज्यपाल बोस यांच्या विभयभंगाचा आरोप झाल्यानंतर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत, असा सवाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. संदेशखली येथे पोहोचण्याची तत्परता दाखविणारे राज्यपाल बोस यांच्यावरच आता विनयभंगाचा आरोप झाला आहे, अशी टीका मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केली.

भ्रष्टाचाराची लढाई थांबणार नाही; राज्यपाल बोस यांचा पलटवार

असे अनेक आरोप माझ्यावर होतील, पण भ्रष्टाचार व हिंसाचार हद्दपार करण्याची लढाई थांबणार नाही. माझ्या या ध्येयापासून मला कोणीच रोखू शकणार नाही, असा पलटवार राज्यपाल बोस यांनी केला आहे.

तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती

24 एप्रिलनंतर पुन्हा 2 मे रोजी राज्यपाल बोस यांनी पुन्हा त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले. त्या दिवशी मी संध्याकाळच्या शिफ्टला होती. मी माझ्या वरिष्ठाला सोबत घेऊन गेले. तेथून माझा वरिष्ठ गेल्यानंतर पुन्हा राज्यपाल बोस यांनी विद्यापीठात नोकरी देण्याचा विषय काढला. मी नोकरीला नकार दिला. तुझ्यावर काही दबाव आहे का, असेही त्यांनी मला विचारले. नंतर पुन्हा चर्चेसाठी बोलावले. आपल्यातील चर्चेसंदर्भात कोणाला काही सांगू नको, असे राज्यपाल बोस यांनी मला सांगितले होते. माझी पोलिसांत तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती. मी माझ्या कुटुंबीयांना या प्रसंगाबाबत सांगितले होते, असेही पीडितीने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

राज्यपालांनी मला मागून पकडलेःपीडित महिलेचा गंभीर आरोप

पीडिता महिला राजभवनात पंत्राटी कामगार आहे. 24 एप्रिल 2024 रोजी राज्यपाल बोस यांनी मला बायोडाटा घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. त्यावेळी सचिवाने मला त्यांच्यासमोर बसायला सांगितले. सचिव गेल्यानंतर राज्यपाल बोस यांनी मला त्यांच्या शेजारी बसायला सांगितले. त्यांनी मला माझा पगार विचारला. माझ्या शिक्षणाची चौकशी केली. माझी विविध विद्यापीठात ओळख आहे. मी तुला शिक्षिका म्हणून काम देऊ शकतो, असे त्यांनी मला सांगितले. मी शिक्षिका म्हणून काम करू शकेल का, याचा मला आत्मविश्वास नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी मला विवाहाबाबत विचारले. नंतर हात मिळवण्यासाठी हात पुढे केला, पण मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्या पाया पडले. त्यांनी मला बायोडाटाच्या मागे मोबाईल क्रमांक लिहिण्यास सांगितले. मी मोबाईल क्रमांक लिहित असताना राज्यपाल बोस यांनी मला मागून पकडले. मी त्यांना ढकलून दिले व तेथून पळ काढला, असा गंभीर आरोप पीडितेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.