प्लेलिस्ट – मंत्रमुग्ध करणारी सुरावट

>> हर्षवर्धन दातार

सोळाव्या शतकात मध्य आशियातून आपल्याकडे आलेले सतार हे अतिशय मधुर आणि कर्णप्रिय सुरावट प्रदान करणारे वाद्य. हिंदुस्थानी संगीतात प्रामुख्याने सोलो वाद्य म्हणून लोकप्रिय झालेल्या या वाद्याला पंडित रविशंकर आणि उस्ताद विलायत खां यांनी जागतिक मंचावर नेले. हिंदी चित्रपट गीतांतही सतार वादनाने वेगळेपण आणले.

‘कोहिनूर’ (1960) चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या ‘शकील-नौशाद-रफी’ या त्रिवेणी संगमातून साकारलेल्या आणि तुफान गाजलेल्या शास्त्राrय बाजाच्या गाण्यात पडद्यावर दिलीप कुमार वाद्य वाजवताना दिसतो. पुढे ‘आप की कसम’मध्ये (1974) आनंद बक्षी-आर.डी. बर्मन-लता यांच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ गाण्यात पडद्यावर संजीव कुमार तेच वाद्य वाजवतो. अतिशय मधुर आणि कर्णप्रिय सुरावट प्रदान करणारे हे वाद्य आहे सतार! बहुधा सोळाव्या शतकात हे वाद्य मध्य आशियातून आपल्याकडे आले आणि उत्कर्ष पावले. सतारमध्ये अनेक तारा असू शकतात. काही सतारीमध्ये 15 पेक्षा जास्त तारासुद्धा असतात. प्रकृतीत आपल्या वीणा या वाद्याशी साधर्म्य आणि मूळ पर्शियन शब्द ‘सेहतार’ अर्थात तीन तारा असलेले सतार हे वाद्य पुढे हिंदुस्थानी संगीतात प्रामुख्याने सोलो वाद्य म्हणून लोकप्रिय झाले आणि पंडित रविशंकर आणि उस्ताद विलायत खां यांनी त्याला जागतिक मंचावर प्रसिद्ध केले. सर्वश्री दिग्गज सतार वादक रईस खान, जयराम आचार्य, अरविंद मयेकर, नीलाद्री कुमार, कार्तिक कुमार यांनी आपल्या प्रतिभेने चित्रपट गीतांत रंगत आणली. बघू या, हिंदी चित्रपट गीतांत सतार वादनाने काय वेगळेपण आणले.

‘ओ सजना, बरखा बहार आई’ हे ‘परख’मधले (1960) शैलेंद्र-सलील चौधरी-लता यांचे अजरामर गीत. पडद्यावर पावसाचं आणि पूर्ण बाह्यांचा ब्लाऊज घातलेल्या आणि कुंकू लावलेल्या नितांत सुंदर साधनाचं आगमन. जोडीला जयराम आचार्य यांच्या सतारीच्या सूरांनी खरोखरच बहार आणली. ‘छोटे नवाब’ या आर.डी. बर्मन यांच्या पदार्पणातील चित्रपटात आणि त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताजींनी प्रथमच गायलेल्या ‘घर आजा के घिर आई’ या मालगुंजी रागातील गीतात वाजलेली सुंदर सतार आपल्या हृदयात वसते. पुढे जयराम आचार्य पंचमदाबरोबर नियमित साथसंगत करू लागले. ‘आंधी’ (1975) या आणीबाणीच्या काळातील वादग्रस्त चित्रपटात ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही’ या कालातीत गाण्यात सतार जयरामजींचीच आहे. संजीव कुमार आणि सुचित्रा सेनच्या जुन्या आठवणीना उजाळा देण्याकरिता पंचमनी सतारचे सूर कल्पकतेने वापरले आहेत . सतारीच्या सुरात एक उपजत आनंदी वृत्ती आहे. त्यामुळे प्रसंगात आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण निर्मितीकरिता सतारीच्या सुरावटीचा उपयोग होतो. चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. गुलजार-पंचम सहकार्याच्या ‘परिचय’ (1972) या पहिल्या चित्रपटातसुद्धा संजीव कुमार सतार वादक आहे आणि ‘बिती ना बितायी रैना’ हे भूपेंद्र-लता यांच्या गायकीबरोबर सतार वादनाने अधिक कर्णप्रिय झाले आहे. ‘भीगी हुयी अखियों से लाख बुझायी रैना’ यातून संजीव-जया या बाप-लेकीतल्या नात्याचे भावनिक बंध प्रकट होतात.

‘मेहबूबा’ (1976) चित्रपटात मन्ना डेंनी गायलेल्या ‘गोरी तोरी पैंजनिया’ या गाण्यात इतर ताल आणि तारवाद्यांसोबत सतारही प्रामुख्याने सोबत करते. आर. डी. बर्मननी हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताचा कल्पक मेळ साधला आहे. गाण्याच्या शेवटी ख्यातनाम तबला वादक पंडित सामता प्रसाद आणि पंडित कीर्तिकुमार यांच्या बहारदार जुगलबंदीने होतो. अनेक प्रसंगांत वर्षा ऋतूचे आगमन, मोर आपला पिसारा फुलवून मेघगर्जनेचे स्वागत करताना बॅकग्राऊंडमध्ये सतारीचे सूर ऐकू येतात. ‘गाईड‘ (1965) या नृत्य-संगीतप्रधान चित्रपटात ‘पिया तोसे नैना लागे रे’ गाण्यात लताच्या पहिल्या ओळीला सुंदर समर्पक जी सतार वाजते ती जणू या ओळींना दादच देते. आटपाट नगर आणि तेथील निद्रानाश जडलेली राजकुमारी या कथेवर आधारित चित्रपट ‘शबाब’ (1954). संगीतकार नौशाद आणि पडद्यावर भारत भूषण आणि नूतन सतार वाजवत बसंत बहार रागावर आधारित गाणे म्हणतात ‘मन की बीन मतवारी’. सुरुवात आणि संपूर्ण गाण्यात मंत्रमुग्ध करणारी सुरेल सतार वाजते. ‘अजी बस शुक्रिया’ (1958) यातलं लताच्या आवाजातले विरह गीत ‘सारी सारी रात तेरी याद सताये’ वाणी जयरामला प्रसिद्धी देणारे ‘गुड्डी’मधलं (1957) वसंत देसाई यांचं ‘बोले रे पपीहरा’ आणि ‘शारदा’ (1957) चित्रपटातलं ‘ओ चांद जहाँ वो जाये’ ही जयराम आचार्य यांच्या सतारीचे योगदान असलेली लोकप्रिय गाणी.

उस्ताद रईस खान हे संगीतकार मदन मोहन यांचे आवडते सतार वादक. सतारीच्या उत्कृष्ट सुरावटीने सजलेली अनेक गाणी या जोडीने दिली. त्यांच्या रसग्रहणाकरिता स्वतंत्र लेख लिहावा लागेल. ‘नैनो मे बदरा छाये’ हे ‘मेरा साया’मधले एक अतिशय सुमधुर गाणे. यात सतारीच्या जोडीला संतूरची नाजूक साथही आहे. नायिका साधनाचे भावविव्हल प्रकटीकरण सतारीच्या सुरांतून व्यक्त होते. ‘दिल कि राहें’ (1973) यातील ‘रस्मे उल्फत को निभायें कैसे’ ही मधुवंती रागातली गझल म्हणजे लता-रईस खान जुगलबंदीच जणू. गाण्याच्या शेवटी पडद्यावरील रेहाना सुलतानचा ‘दर्द’ सतारीच्या उत्कट सुरावटीतून परमोच्च शिखर गाठतो.

अनेक गाण्यांमध्ये जिथे भिन्न प्रकृतीच्या भावनांचा कल्लोळ अभिप्रेत आहे, तिथे सतार-सरोद-सारंगी हा तारवाद्यांचा त्रिवेणी संगम अभिनव पद्धतीने वापरला जातो. ‘जहाँआरा’ (1964) चित्रपटातील मदन मोहन संगीत दिग्दर्शित ‘वो चूप रहे तो दिल के डाग जलते है’ हे या तिहेरी जुगलबंदीचे उत्कृष्ट उदाहरण. पडद्यावर गाणे जरी मुजरा प्रसंगावर चित्रित असले तरी सांगितिक अर्थात गझल प्रकारात आहे.

भव्य वाद्यवृंद घेऊन संगीत निर्मिती करणारे शंकर-जयकिशन यांनीसुद्धा ‘आम्रपाली’मध्ये (1966) ‘तुम्हे याद करते करते’ यात सुनील दत्त-वैजयंतीमाला यांचा सहवास दाखवताना सतारीचा सुंदर उपयोग केला आहे. ‘दिल एक मंदिर’(1963) या अतिशय भावनाप्रधान तसेच संगीतप्रधान चित्रपटात मीनाकुमारी सतार वाजवताना ‘हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे है’ गाण्यातून राजकुमाराच्या प्रति आपले प्रेम व्यक्त करते. या अभिव्यक्तीची बैठक सतारीच्या सुरांतून तयार होते. उदास परिस्थितीतसुद्धा सतारीचे सूर आपल्याला शांतता, निरामयता प्रदान करतात. ‘दिल दिया दर्द लिया’मध्ये (1966) ‘कोई सागर दिल को बेहलाता नही’ या शकील-नौशाद-रफी यांच्या नितांतसुंदर रचनेला साथ आहे सतारीच्या सुरांची.

हिंदुस्थानी सिनेजगतात मैलाचा दगड ठरलेल्या 1955 च्या सत्यजित रे दिग्दर्शित ‘पाथेर पांचाली’ला पंडित रविशंकर यांचे संगीत होते. यात त्यांनी राग देश आणि तोडीवर आधारित सुंदर स्वररचना केल्या आहेत. सतारीच्या मंत्रमुग्ध करणाऱया गोड सुरावटीवर आधारित आणखी काही गाण्यांचा परामर्श पुढील भागात.

[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)