जनतेला क्षुल्लक समजणाऱ्या मोदी-शहांना सिंघम बनून धडा शिकवा – उद्धव ठाकरे

इतरवेळी क्षुल्लक वाटणाऱया माणसांपुढे तुम्ही आता का झुकता आहात, का मतांची भीक मागत आहात, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धाराशीवमधील विराट जाहीर सभेत मतदारांना साद घातली. ‘तुम्ही आता सिंघम व्हा आणि म्हणा, आली रे आली आता माझी पाळी आली. आता माझी सटकली… आता तुला सटकवणार’, असे उद्धव ठाकरे गरजताच जनसमुदायातून तुफान प्रतिसाद मिळाला.

धाराशीवमधील मल्टीपर्पज कन्या शाळेच्या मैदानावर शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती. या गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहा आणि फडणवीसांवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल परवा एक मुलाखत दिली. त्यामध्ये ते काहीतरी म्हणाले. यानंतर मला अनेकांनी मेसेज केले आणि विचारले, मोदींना तुमचे प्रेम कसे आले. मीही त्यांना म्हटलं, मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. मात्र, मोदींचे प्रेम एवढे उतू गेले आहे की, ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. त्यांच्याबद्दल मला प्रेम, आस्था आहे. मग मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. मग हे जर खरे असेल तर तेव्हा ते तुमच्या खालच्या माणसांना माहिती नव्हतं का? एका बाजूला तुम्ही चौकशी करत होता, मग हे तुमचे पाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हतं का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी बाळासाहेबांचे विचार सोडले असे मोदीजी म्हणाले. 2014 मध्ये मी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईला परतलो आणि एकनाथ खडसे यांचा फोन आला, आम्ही युती तोडत आहोत असे त्यांनी सांगितले. वरूनच आदेश आला आहे असेही खडसे यांनी सांगितले. युती तोडण्याच्या या निर्णयाबद्दल मोदीजी, तुम्हाला माहिती नव्हते? 2014 मध्ये हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती नव्हते का? माझ्यावर शिवसेनाप्रमुखांचे कर्ज आहे असेही मोदीजी म्हणाले. मग त्याच शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून अमित शहांनी मला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, तुम्हाला हे माहिती नव्हते का? मी तर तुळजाभवानीची शपथ घेऊन जे त्या खोलीत घडले ते जनतेला सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द तुम्ही मोडलात आणि खोटे मला ठरवलेत! उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या बेगडी प्रेमाचा मुखवटाच ओरबाडून काढला. बाळासाहेब काय म्हणता, हिंदुहृदयसम्राट म्हणा! हिंदुहृदयसम्राट म्हणताना तुमची जीभ अडखळते काय? असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

आपले सरकार येणारच असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे यांनी सरकार आल्यावर काय करणार याची यादीच दिली. कांदा निर्यातीवरची बंदी उठवणार, शेतीसाहित्यावर लावण्यात आलेली जीएसटी काढणार, करप्रणालीत बदल करणार आणि मुख्य म्हणजे छोटय़ा व्यापाऱयांमध्ये हप्ता चुकला की धाड अशी जी दहशत आहे… हा करदहशतवाद आम्ही संपवणार असे वचनच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. महाराष्ट्राच्या हक्काचे जे उद्योग गुजरातला पळवून नेले ते परत महाराष्ट्रात आणणार, महाराष्ट्राचे वैभव पुन्हा नव्याने उभे करणार असा शब्दही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जनतेला दिला.

यावेळी सभेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार पैलास घाडगे – पाटील, सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, मकरंद राजेनिंबाळकर, लातूर जिल्हाप्रमुख दिनकर माने, जिल्हाप्रमुख रणजित पाटील, शरद कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

… तर देश पेटून उठेल

उद्धव ठाकरे यांना भाषणापूर्वी संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. त्याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी चारशेपारचा नारा दिला आहे. कशाला हव्यात तुम्हाला चारशे जागा? महामानवाने लिहिलेली घटना बदलण्यासाठी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान तुम्हाला मान्य नाही. कारण तुम्ही उच्च आहात म्हणून? याद राखा! घटना बदलण्याचा प्रयत्न कराल तर देश पेटून उठेल!! लोकांना एकदा मूर्ख बनवू शकाल. अंधभक्तांना कायम मूर्ख बनवू शकाल. पण आता जनता जागी झाली आहे, तुमचे मनसुबे उधळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा खणखणीत इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

किती मताधिक्य देणार

भाषणाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना समोर बोलावले. हा आपला उमेदवार आहे. याची निशाणी असे उद्धव ठाकरे म्हणताच… समोरील विशाल जनसमुदायाने मशाल, मशाल… असा एकच जल्लोष केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी किती मताधिक्य देणार असा प्रश्न करताच लाख, लाख.. असा गजर झाला!

मशाल, हुकूमशहाचे तख्त जाळून टाकेल

काय बोलू मी… तुफान गर्दी पाहून मी भारावून गेलो आहे. मराठी मातेचा, मराठी मातीचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या विरोधात लढतो आहे. महाराष्ट्रात मोदीविरोधाची लहर उसळली आहे. हा महाराष्ट्र तुम्हाला माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करून उद्धव ठाकरे म्हणाले, ही भडकलेली मशाल दिल्लीच्या हुकुमशहाचे तख्त जाळल्याशिवाय राहणार नाही. मी काही जुगाड लावायला आलो नाही. तुमचे आयुष्य जुगाड आहे असे ज्यांना वाटते त्यांना सगळेच तसे वाटत असावेत असा टोलाही त्यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना लगावला. ही निवडणूक जनतेनेच आता हातात घेतली आहे. इथे आयोगाचे पॅमेरे आहेत. अमित शहांचे गुप्तहेरही आले असतील. पण आपला कारभार सगळा उघडा, काय बघायचे आहे ते बघा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हनुमानाने जशी त्याच्या शेपटीची मशाल करून रावणाची लंका जाळली तशीच मोदींच्या हुकूमशाहीची लंका आपल्याला जाळायची आहे.

मशाल गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही

पुण्याच्या सभेत मी मोदींना आव्हान दिले होते. द्वारकेत समुद्राच्या तळाशी गेला होतात ना, पूजा करायला! धाराशिवला जात आहात, तर तुळजाभवानीचे दर्शन घ्या. गेले का मोदी, दर्शनाला? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारताच तुडुंब गर्दीनेच नाही असे खणखणीत उत्तर दिले. भाषणाची सुरूवात जय भवानी या घोषाने करा, असेही मी म्हणालो होते. केली का? नाही! मग मशाल गीतात असलेल्या जय भवानी शब्दाला मोदींच्या घरगडय़ाची आक्षेप घेण्याची हिंमत कशी झाली? काय कारवाई करायची असेल ती करा. मशाल गीतातून जय भवानी हे घोषवाक्य काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतोय, आता इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तेव्हा या भाजपच्या घरगडय़ांनी लक्षात ठेवावे. एकेकाला बघितल्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट बजावले.

खोट कोण बोलतंय… मोदी, मोदी!

मी मुख्यमंत्री असताना शेतकरी कर्जमुक्त केला की नाही? शिवभोजन मिळाले की नाही? कापूस, सोयाबीनला भाव मिळाला की नाही? महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर उद्योग येत होते की नाही? उद्धव ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर गर्दीतून होय, असे उत्तर आले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट झाले का? दोन कोटी रोजगार मिळाले का? पीक विम्याचे पैसे मिळाले का? घर मिळाले का? गॅसचा भाव कमी झाला का? पेट्रोल, डिझेल कमी झाले का? मोदीजी म्हणतात ये तो ट्रेलर है… त्यांचा पुढचा पिक्चर तुम्हाला बघायचाय का? असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच नाही असा आवाज घुमला. मग आता मला सांगा खोटं कोण बोलतंय… त्यावरही सभेतून मोदी असा पुकारा झाला.

महाराष्ट्र धर्म तुम्हाला नेस्तनाबूत करेल

सगळे काही आलबेल आहे मग महाराष्ट्रात का फेऱया मारता आहात? सभांवर सभा घेण्याचा धडाका लावलात. कितीही सभा घ्या, तुम्ही महाराष्ट्र जिंकू शकणार नाहीत. औरंगजेबही आला होता हिंदवी स्वराज्य गिळायला. 27 वर्षे राहिला. पुन्हा आग्रा त्याने पाहिला नाही. महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा महाराष्ट्र धर्माचा वन्ही पेटला! या महाराष्ट्र धर्माने आक्रमकांचे नामोनिशाण मिटवले. तुम्हालाही हा महाराष्ट्र धर्म नेस्तनाबूत करेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

राजकारणात तुम्हाला मुले होत नाहीत…

काँग्रेसची सत्ता आली की तुमच्याकडचे सोनेनाणे एवढेच काय मंगळसूत्रही काढून घेतील आणि मुस्लिमांना देतील असे एक वाचाळ विधान मोदींनी केले आहे. त्याचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. राजकारणात तुम्हाला मुले होत नाहीत, त्याला आम्ही काय करावे? आमची मुले कडेवर घेऊन मिरवताय! तिकडे सिंधुदुर्गात अमित शहा यांनी नकली सेना असा पुन्हा उल्लेख केला. आम्हाला नकली म्हणणारे बेअकली आहेत असा जबरदस्त ठोसा यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. समोर बसलेली ही अलोट जनता हेच माझे निवडणूक रोखे आहेत. ही माझी संपत्ती आहे! तुमच्याकडे आहे का हे वैभव, असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

नवाज शरिफांचा केक खायला गेला होतात!

तुमच्यासारखे बुरसटलेले हिंदुत्व आमचे नाही. आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे. निवडणूक आली की हिंदू-मुस्लिम असा भेद करायचा. दंगे भडकवायचे. इंडिया आघाडीचा विजय झाला तर पाकिस्तानला आनंद होईल असे मोदी म्हणाले. नवाज शरीफांच्या घरी न बोलावताच केक खायला कोण गेले होते? पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर डोके कुणी ठेवले? असा तिखट सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. काँग्रेसने 70 वर्षे काही केले नाही म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिले. जे काँग्रेसला जमले नाही ते तुम्ही दहा वर्षात करून दाखवले. दहा हजार कोटी भाजपच्या खात्यात जमा झाले. न्यायालयाने भांडे पह्डले नसते तर आणखी दहा हजार कोटींचे निवडणूक रोखे तयारच होते! असा टोलाही लगावला.

मोदी, तुम्ही महाराष्ट्रावर आणि देशावर संकट बनून आलात!

माझ्या आजारपणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार रात्री गाठीभेटी करत होते. माझे सरकार कसे पाडायचे हे ठरवत होते. पंतप्रधान मोदी तुम्हाला हे माहिती नव्हतं का? आज तुम्ही म्हणता, उद्धव ठाकरे यांच्यावर कधी काही संकट आले तर मी धावून जाईन. ठीक आहे. मोदींवरही संकट आलं तर मीदेखील धावून जाईन. फक्त तुम्ही महाराष्ट्र आणि देशावर संकट बनून आला आहात त्यावर आवर घाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला.

मोदीजी, 2014 मध्ये भाजपने युती तोडण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय तुम्हाला माहिती नव्हता का? शिवसेनाप्रमुखांचे तुमच्यावर कर्ज आहे असे म्हणता, मग अमित शहांनी त्याच शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून मला मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द तुम्हाला माहिती नव्हता का?