अभिनेत्री लैला खान आणि कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी परवेझ टाक याला फाशी

अभिनेत्री लैला खान आणि अन्य पाच जणांच्या हत्येमुळे 2011 साली बॉलिवूडसहित संपूर्ण देश हादरला होता. या गंभीर घटनेतील मुख्य आरोपी लैला खानचे सावत्र वडील परवेझ टाक याला मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरण हे अत्यंत दुर्मिळ असल्यामुळेच सरकारी बाजूने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन पवार यांनी 9 मे रोजी परवेज टाकला भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत इतर गुन्ह्यांसह खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. मात्र आज (24 मे 2024) पार पडलेल्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयाने परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावली आहे.

देशाला हादरवून सोडणारी ही घटना फेब्रुवारी 2011 साली नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जिल्ह्यामध्ये घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी परवेझ टाक हा लैलाची आई सेलिना हिचा तिसरा नवरा होता. सदर घटना इगतपुरीतील एका फार्महाउसवर घडली. परवेझ कुटुंबातील सर्वांना म्हणजेच लैला, तीची आई सेलिना, जुळे भाऊ-बहिण जारा आणि इमरान, मोठी बहिण आफरीन पटेल आणि भाची रेशमा खान यांना इगतपुरीतील एका फार्महाउसवर घेऊन गेला आणि तिथे सर्वांची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी लैलाचे वडील नादिर पटेल यांनी कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, परवेझ टाकवर पोलिसांना संशय आला.

सदर घटना 2012 साली उघडकीला आली. ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये 4 जूलै 2012 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 8 कडे सोपवण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून परवेझला जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडा येथून अटक करून मुंबईत आणले. त्यानंतर काही महिन्यांनी ही घटना उघडकीस आली. मालमत्तेच्या वादातून आरोपीने सेलिना, लैला आणि तिच्या इतर भावंडांचा खून केल्याची कबुली दिली होती.