दुष्काळ आढावा बैठकीला कृषिमंत्री, पालकमंत्र्यांचे दांडी मारणे गंभीर! शरद पवार यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला कृषिमंत्री, पालकमंत्री दांडी मारत असतील तर हे अतिशय गंभीर असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा भयंकर दुष्काळी वणव्यात होरपळून निघतो आहे आणि ते मात्र खुशाल बैठकांना गैरहजर राहत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे दोनच पालकमंत्री हजर होते. धनंजय मुंडे, संजय बनसोडे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे या पालकमंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. धनंजय मुंडे यांच्याकडे तर महत्त्वाचे कृषी खाते असूनही ते बैठकीला आले नाहीत. यावरून टीकेची झोड उठली आहे. पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पालकमंत्र्यांच्या दांडीवरून जाहीर नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला आठपैकी फक्त दोनच पालकमंत्री येत असतील तर दुष्काळाकडे ते कोणत्या नजरेने पाहतात हे लक्षात येते, असा टोला शरद पवार यांनी लगावला. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आहे, परंतु ते देखील बैठकीला आले नाहीत. पालकमंत्र्यांनी बैठकीला न येणे हे अतिशय गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्यात दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मात्र राज्य सरकारचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे आम्हाला आवाज उठवणे भाग आहे. एवढे करूनही सरकारला जाग आली नाही तर इतर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असे शरद पवार म्हणाले.