गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; चकमकीत 8 नक्षलवादी ठार

महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेला विदर्भातील गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी कारवायांमुळे सतत चर्चेच असतो. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये होत असणाऱ्या सततच्या चकमकींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. नक्षलवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून विविध मोहिमा सुद्धा राबवल्या जातात. अशीच एक मोहिम पार पडली असून नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यामधील अबुझमाडच्या सीमावर्ती भागातील रेकाव्याच्या जंगलात कालपासून पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक सुरू होती. अखेर आज पोलिसांना या चकमकीत मोठे यश आले आहे. चकमकीत पोलिसांनी 8 नक्षलवाद्यांना खात्मा केला आहे. या संयुक्त ऑपरेशनमध्ये दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर या तीन जिल्ह्यातील पोलीस सहभागी झाले होते. पोलिसांनी सापळा रचून संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांची चांगलीच कोंडी झाली. डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफच्या एकूण 800 जवानांनी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर इंद्रावती नदीमार्गे पोलीस व लष्कराच्या जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस मुख्यालयाची वाट धरली.