पुणे-बंगळुरू महामार्गावर ट्रकमधील गॅस टाकीला गळती

बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक मलकापूर हद्दीत भारती बँक परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर एका सीएनजी गॅस वाहतूक करणाऱया ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरू झाल्याची घटना पहाटे घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. ज्या ठिकाणी सीएनजी गॅस गळतीचा टँकर उभा होता, त्या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली होती. तर, परिसरातील इमारतीमधील नागरिकांना सुरक्षेच्या कारणातून बाहेर काढण्यात आले होते.

कोल्हापूरहून सातारच्या दिशेने एक सीएनजी गॅसच्या टाक्या घेऊन ट्रक निघाला होता. ट्रक कराडजीक मलकापूर हद्दीतील खरेदी-विक्री संघ पेट्रोल पंप हद्दीत इमारतीशेजारी भारती बँक परिसरात आला. महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी दोन्ही लेनवरील वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू ठेवण्यात आली आहे. सर्व्हिस रोडवरून सातारच्या दिशेने सीएनजी गॅसच्या टाक्यांनी भरलेला ट्रक निघाला असता, अचानक ट्रकमधील टाक्यातून सीएनजी गॅसला गळती सुरू झाली. गॅस बाहेर येत असल्याचे ट्रकमधील ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने त्याने तो ट्रक खरेदी विक्री संघाच्या इमारतीसमोर सर्व्हिस रस्त्यावर उभा केला.

ट्रकमधील सीएनजी गॅसला गळती लागल्याचे परिसरात असणाऱया इमारतीमधील रहिवाशांनी पाहिले. त्यांनी तत्काळ इमारतीतून खाली धाव घेतली. तसेच इतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत लिकेज झालेल्या सीएनजी टाकीचे लिकेज काढून बाहेर पडणारा सीएनजी गॅस बंद केला. साधारण एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सीएनजी गॅसवर नियंत्रण मिळवण्यात ड्रायव्हरला यश आले. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले