कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणी कारवाई, एचडी रेवण्णा यांना अटक

भाजपचा मित्रपक्ष जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणी कारवाईला वेग आला असून एसआयटीने आज प्रज्वलचे वडील जेडीएस नेते एचडी रेवण्णा यांना अटक केली आहे.

एचडी रेवण्णा यांच्या निवासस्थानी घरकाम करणारी महिला बेपत्ता झाली होती. त्या महिलेच्या मुलाने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेचाही व्हिडीओ या सेक्स स्कँडल प्रकरणात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी एचडी रेवण्णा यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. त्यानंतर एसआयटीच्या पथकाकडून एचडी रेवण्णा यांना आज ताब्यात घेण्यात आले व चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

प्रज्वलला ब्लू कॉर्नर नोटीस?

सेक्स स्कँडल प्रकरण समोर येताच माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा परदेशात पळून गेला आहे. तो जर्मनीत असून त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आलेली असून आता ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याबाबत सीबीआयकडून इंटरपोलला विनंती केली जाणार असल्याचे कळते. ही नोटीस जारी झाल्यास प्रज्वलचे नेमके वास्तव्याचे ठिकाण हुडकण्यास व इतर माहिती मिळवण्यास मदत होणार आहे.