मालमत्ता कर थकवणाऱया सहा गॅरेजवर जप्ती; थकबाकीदारांविरोधात पालिकेची धडक कारवाई

वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱया सहा ऑटो गॅरेज मालमत्ताधारकांवर पालिकेने आजपासून जप्ती आणि सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आज सहा गॅरेजवर जप्ती आणि सील करण्याची कारवाई करण्यात आली. या सहाही मालमत्ताधारकांकडे एकूण 45 लाख 35 हजार 359 रुपयांची कर थकबाकी आहे.

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याच्या वतीने वेळोवेळी केले जात आहे. मात्र अनेक थकबाकीदारांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पालिकेने जप्ती आणि सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीदेखील थकबाकीदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पालिकेने आजपासून धडक कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या ‘एस’ विभागाच्या टीमने आज टागोरनगर विक्रोळी (पूर्व) परिसरातील सहा मोटार गॅरेज मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात आली.

पाच दिवसांत थकबाकी भरा, अन्यथा लिलाव

आजच्या कारवाईमधील हरदीपसिंग धालीवाल (01 लाख 86 हजार 709 रुपये), अवतारसिंग गुरुमितसिंग (02 लाख हजार 20 रुपये), अर्जुनसिंग गुरुमितसिंग (06 लाख 4 हजार 877 रुपये), सुखविंदर काwर धालीवाल (01 लाख 03 हजार 84 रुपये ), दारासिंग धालीवाल (27 लाख 82 हजार 492 रुपये),  जगतारासिंग गुरुमितसिंग (06 लाख 4 हजार 877 रुपये) अशी जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांची नावे आहेत. या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल, असा इशारा पालिकेडून देण्यात आले आहे.

अंतिम मुदत 25 मे

दरम्यान, सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक 25 मे 2024 आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.