महायुतीच्या नेत्यांतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर; राजूरमधील कार्यक्रमातील बॅनरवर उमेदवार लोखंडे यांचा फोटोच नाही

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिर्डी मतदारसंघात निवडणुकीसाठी अकोले येथे महायुती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला अकोल्याचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार डा. किरण लहामटे यांनी पाठ फिरविली. आज इंदोरी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रत्येक वक्त्याने शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी आवाहन केले. मात्र, व्यासपीठावरील फलकावर उमेदवार लोखंडे यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून आले. भाजप मित्रपक्षांकडून प्रचार सुरू असला, तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद मोठय़ा प्रमाणात असल्याचे आज दिसून आले.

आज मातोश्री लॉनवर झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर लावलेल्या फलकावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री विखे, सुनील तटकरे यांच्यासह 31 पदाधिकाऱयांचे फोटो होते. मात्र, ज्यांच्या प्रचारासाठी हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला, ते शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचाच फोटो टाळण्यात आला होता. यामुळे मिंधे गटाचे उमेदवार असलेले लोखंडे यांचा फोटो मुद्दामहून टाळण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती.

आमदार किरण लहामटे यांनीदेखील बुधवारी अकोले येथील लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविली होती. कारण आपण गैरहजर का राहिलो, याबाबत त्यांनी कोणताच खुलासा केला नाही. तसेच आता फलकावर लोखंडे यांचा फोटो का टाळला, याबाबतही खुलासा केलेला नाही. त्यामुळे महायुतीतील दोन गटांत अंतर्गत संघर्ष धुमसत असल्याचे दिसून आले.