सृजन संवाद – रामायणातील सॉफ्ट स्किल्स

>> डॉ. समिरा गुजर जोशी

आज संभाषण कौशल्य हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. आपल्या पूर्वजांनी संभाषणविद्येचा सखोल अभ्यास केला होता. मुनी वाल्मीकींनी ह्याविषयी रामायणात अनेक ठिकाणी विवेचन केले आहे. खास करून अधिकारी व्यक्तीने कसे बोलावे ह्याविषयी त्यांनी सखोल विचार मांडला आहे. रामाला राजा करावे असा विचार जेव्हा दशरथ राजा मांडतो त्या वेळी त्याच्या शौर्य, विद्वत्ता या इतकेच महत्त्व त्याच्या वत्तृत्व गुणांना दिले आहे. त्याचे बोलणे, वागणे अतिशय नम्र आणि मृदु होते. ह्यासंदर्भात सहजच भवभूतीच्या उत्तररामचरितम् ह्या नाटकातील एक प्रसंग आठवतो. राम रावणावर विजय प्राप्त करून आता अयोध्येचा राजा झाला आहे. इथून ह्या नाटकाची सुरुवात होते. ह्या नाटकातील एका प्रसंगात एक वृद्ध सेवक जो दशरथ महाराजांच्या काळापासून राजमहालात कामाला आहे तो रामाला नकळत लहानपणी हाक मारायचा त्याप्रमाणे ‘रामभद्र’ अशी हाक मारतो आणि लगेच आपली चूक सुधारत ‘महाराज’ अशी हाक मारतो. त्यावर राम हसून म्हणतो, “तुम्ही मला रामभद्र म्हणणेच योग्य आहे आणि मी अजूनही तुमच्यासाठी तोच राम आहे.’’

प्रसंग छोटासाच आहे, पण आज ज्याला आपण interpersonal relations म्हणतो, खास करून बॉस आणि एम्प्लॉई यांच्यामधील नाते कसे असावे, हा प्रसंग ह्याचे उत्तम उदाहरण आहे. वाल्मीकींनी देखील हा गुण एका वेगळ्या उदाहरणाद्वारे सांगितला आहे. ते म्हणतात यदा व्रजति संग्रामम् नाविजित्य निवर्तते। रामाला लढण्यासाठी पाठवले की तो कधीही पराजित होऊन येत नाही. जिंकणे हेच त्याला माहित आहे. पण जिंकून परतताना तो काय करतो? पौरान् स्वजनवत् नित्यं कुशलं परिपृच्छति। त्या नव्याने जिंकलेल्या प्रदेशातील लोकांमध्ये मिसळून त्यांची आस्थेने चौकशी करतो. अशी वर्णने वाचताना छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांमध्ये कशा प्रकारे मिसळत असत ह्याच्या कथा आठवतात.

आजही जे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड लोकप्रियता मिळवलेले नेते आहेत त्यांच्यातील सामायिक गुण म्हणजे त्यांचे कार्यकर्त्यांशी असलेले नाते. एकदा दोनदा भेटलेल्या व्यक्तीचेही नावगाव लक्षात ठेवून तो कितीही काळाने भेटला तरी त्याची चौकशी करणे हा गुण ह्या सर्व नेत्यांमध्ये आहे. ह्या एका गोष्टीने जसे लोकांचे मन जिंकता येते तसे पाण्यासारखा पैसा ओतूनदेखील शक्य नाही. ‘साहेबां’ना आपण लक्षात आहोत हा आनंद त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱयावर वाचून घ्यावा.

रामाच्या ठिकाणी आदर्श नेता होण्यासाठी जे गुण आहेत त्यातील हा विशेषत्वाने वर्णन केला गेलेला गुण आहे, हसून बोलणे ही खरे तर किती छोटीशी गोष्ट. पण त्याचे महत्त्व आपण विसरतो. राम ‘स्मितपूर्वाभिभाषण’ आहे म्हणजेच त्याच्या बोलण्याची सुरुवात स्मितहास्याने होते. हास्य समोरच्याला आश्वस्त करते. आपला अधिकार दाखवायचा म्हणजे कडू काढा प्यायल्यासारखा चेहरा करायला पाहिजे असे अजिबात नाही. चेहऱयावर स्मित ठेवून आपले मत शांतपणे मांडता येते याचा अनेकदा अधिकारी वर्गाला विसर पडतो. पण अनेक पोलीस अधिकारी आपले अनुभव सांगताना हे नमूद करतात की, गावात अगदी संघर्षाचे, तणावाचे वातावरणसुद्धा ठामपणे पण हसून, मैत्रीच्या नात्याने संवाद साधल्याने निवळते. अर्थात त्यांनी एरवीदेखील बंदोबस्तासाठी येता-जाताना स्थानिक जनतेकडे हसून पाहिलेले असते, त्या ‘शब्देविण-संवादा’तून एक मैत्रीचे नाते प्रस्थापित केलेले असते. रामाचे नेता म्हणून आणखी एक वैशिष्टय़ की त्याला संस्कृतबरोबर व्यामिश्र म्हणजे अनेक बोलीभाषा किंवा स्थानिक भाषाही बोलता येत होत्या.

रामायणात असाच उत्तम वक्ता म्हणून आपल्या समोर येतो तो ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असणारा, मारुतीराया. त्याच्या शक्तीविषयी वेगळे बोलायलाच नको, पण तो रामदूत म्हणून योग्य ठरतो तो त्याच्या संभाषण कौशल्याने. या दृष्टीने त्याची राम-लक्ष्मण यांच्याशी झालेली पहिली भेट पाहण्यासारखी आहे. सुग्रीवाच्या प्रदेशात हे दोन अनोळखी तरुण धनुष्यबाण धारण करून आले आहेत. सुग्रीव आणि वाली ह्यांच्यात संघर्ष सुरू आहे, त्यामुळे ही वालीने पाठवलेली माणसे तर नाहीत ना, अशी सुग्रीवाला शंका आहे. अशा वेळेस तो आपला सचिव म्हणून हनुमंताला पुढे पाठवतो. हनुमंत इतक्या गोड शब्दात त्या दोघांची चौकशी करतो. तो विचारतो, “राजकुमारच वाटावे असे तुम्हा दोघांचे रूप, पण तुम्ही तापसी वेष धारण केला आहे आणि तुम्हाला मुनीजन म्हणावे तर तुम्ही धनुष्यधारी आहात. ह्या पृथ्वीचे रक्षण करण्याचे सामर्थ्य तुमच्या ठायी दिसते आहे. तुमचे स्थान राजधानीत असायला हवे, मग तुम्ही ह्या हिंस्त्र पशुंनी भरलेल्या जंगलात कसे?’’ हे बोलताना त्याच्या आवाजाची पट्टी फार मोठी किंवा कमी नाही. आवाज सुस्पष्ट आहे. वाक्यरचना उत्तम आहे. व्याकरण सांभाळलेले आहे. त्यामुळे वाल्मीकी त्याला ‘वाक्यज्ञ’ म्हणतात. त्याच्या आणखी एका गुणाचा उच्चार ते करतात ते म्हणजे बोलताना उत्तराच्या अपेक्षेने कधी थांबावे हेही तो जाणतो. ‘माझे सांगून झाले, आता तुम्ही सांगा’ असे म्हणण्याचे भान त्याला आहे. अनेक वत्ते बोलताना समोरच्याच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करून एकटेच बोलत राहतात ह्याचा अनुभव तुम्हालाही असेलच. म्हणूनच आजच्या कॉर्पोरेट युगातही संभाषण कौशल्य वा सॉफ्ट स्किल्सचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यासाठीची उदाहरणे आपल्या संस्कृतीने आपल्याला साक्षात रामाच्या, हनुमंताच्या रूपात दिली आहेत हे विशेष.