भाजपातील निष्ठावंतांचे मत नोटाला! जे घडतंय ते चांगलं नाही, असे सांगणारे फोन येताहेत – सुमित्रा महाजन

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे. सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडल्यानंतर इंदूरमध्येही भाजपने काँग्रेस उमेदवाराला पळवले. फोडाफोडीच्या या राजकारणामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि खदखद असून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भाजपला आरसा दाखवला आहे. इंदूरमध्ये आम्ही नोटाला मतदान करणार असे पक्षाचे अनेक जुने कार्यकर्ते मला फोन करून सांगत असल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगितले.

इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी माघार घेतली आणि लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला. खुनाच्या प्रकरणाचे जुने प्रकरण उकरून काढून त्यांच्यावर भाजपने दबाव टाकल्याचा आरोप त्यानंतर काँग्रेसने केला होता. यावरून भाजपवर चौफेर टीका होत असतानाच आता भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनीच पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. इंदूरमध्ये जे घडले आहे ते धक्कादायक आहे. असे व्हायला नको होते, असे नमूद करत त्यांनी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमधील खदखद सांगितली.

n भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते मला फोन करत आहेत. शहरातील अनेक प्रतिष्ठतांचेही फोन येत आहेत. ज्या प्रकारे काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेऊन भाजपात प्रवेश केला त्यावर सगळेच नाराजी व्यक्त करत आहेत. भाजपने जे केले ते चांगले नाही. आम्ही आता ईव्हीएमवर कमळ नाही तर नोटा हा पर्याय निवडणार असे बहुतेकांचे म्हणणे आहे, असे सुमित्रा महाजन यांनी सांगितले.