दापोलीत संशयास्पद मृत्यूंच्या घटनेत वाढ; पोलिसांसमोर गुन्हांची उकल करण्याचे मोठे आव्हान

दापोलीमध्ये सध्या संशयास्पद मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सर्व घटनांमुळे नागिराकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या या संशयास्पद मृत्यूंमुळे पोलिसांसमोर गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दापोली तालूक्यातील दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कोळथरे या गावात मित्रांच्या भांडणात एका मित्राला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला फक्त तीन दिवस झाले होते. ही घटना ताजी असतानाच दापोली पोलीस ठाण्यातर्गंत येणार्‍या वणंद लोवरेवाडी या गावामध्ये भाग्यश्री दशरथ लोवरे वय वर्ष 51 या महिलेचा तिच्या राहत्या घरातच विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यामुळे विविध तर्क वितर्क काढले जात आहेत. या दोन घटनांची सध्या तालुक्यामध्ये चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र मागील काही महिन्यांचा विचार केला तर संशयास्पद मृत्यू आढळून आल्याच्या अनेक घटना दोपालीमध्ये घडल्या आहेत. स्टेट बँकेत कार्यरत असलेल्या पूजा चव्हाण या युवतीचा संशयास्पद मृत्यू, विसापूर येथील प्रभावती घाग या वृद्धेचा मृत्यू, करंजाळीत आलेल्या एका तरुणाचा मृत्यू आणि आता कोळथरे येथे तरुणाचा खून व वणंद लोवरेवाडी येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू. या सर्व घटना संशयास्पद आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांसमोर सुद्धा या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आहे.