
सातारा जिह्यात ग्रामपंचायत स्तरावर 526 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे हवामान, पाऊस व वादळाचा अंदाज ही किमान माहिती त्या गावापुरती प्राप्त होणार आहे. या हवामान केंद्रांसाठी ग्रामपंचायतीकडून जागानिवडीची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱयांना जागेची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
स्वयंचलित हवामान केंद्रांमार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱया नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत ‘महावेध’ या प्रकल्पांतर्गत महसूल मंडळ स्तरावर 91 स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नव्याने हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी तांत्रिक निकषानुसार जागा उपलब्ध करून द्यायची आहे.
हवामान केंद्रासाठी जागा निवडताना सभोवताली मोठी झाडे, इमारती असू नयेत, मोठा जलाशय, उष्णता स्रोत नसावा, जवळून जाणाऱया हाय टेन्शन पॉवर केबल नसाव्यात, जागा दलदलीची अथवा पाणथळ नसावी, वाऱयाची दिशा आणि वेग मोजणारा सेन्सर जमिनीपासून 3 मीटर अंतरावर उभारलेला असावा, अडथळ्यांच्या उंचीच्या 10 पट अंतरावर सेन्सर उभारण्याची निश्चिती करावी. तापमान आणि आर्द्रता सेन्सर जमिनीपासून 1.25 मीटर ते 2 मीटर दरम्यान उभारण्यात यावा. पर्जन्यमापक यंत्र जमिनीपासून 30 से.मी. उंचीवर उभारलेले असावे. पर्जन्यमापक यंत्र मोकळ्या जागेत उभारण्यात यावे. सभोवताली असलेल्या अडथळ्यांच्या उंचीच्या चार पट अंतरावर केंद्र उभारण्यात यावे, अशा सूचना कृषी विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
तालुकानिहाय स्वयंचलित हवामान केंद्रे
z जावली तालुक्यात 34, कराड 75, खंडाळा 23, खटाव 52, कोरेगाव 52, माण 41, पाटण 64, फलटण 52, सातारा 69, वाई 40, महाबळेश्वर 24 अशी मिळून 526 ठिकाणी नव्याने स्वयंचलित हवामान केंद्रे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
































































