भरधाव बस झोपड्यावर धडकली, भीषण अपघातात चार मजूरांचा मृत्यू

दक्षिण गोवा जिल्ह्यातील एका औद्योगिक वसाहतीत एका खासगी बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांना धडक दिली. या घडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या देशभरात दुर्घटनांचं सत्र सुरू आहे. अनेक हृदयद्रावक घटनांनी सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच दरम्यान आता रविवारी दक्षिण गोव्यातील वेर्णा परिसरात रस्ते बांधकाम मजूरांच्या झोपड्यांवर एक बस चढली. हा अपघात इतका भीषण होता की सर्व झोपड्या भुईसपाट झाल्या व या झोपड्यांतील दहा जणांना चिरडून बस पुढे निघून गेली.

य़ा प्रकरणी पोलिसांनी बस चालक भरत गोवेकर याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय चाचणीत भरत गोवेकर हा दारू पिऊन बस चालवत असल्याचे समोर आले आहे. तसेच या आरोपीने बचावलेल्या मजूरांना पोलिसांत तक्रार न करण्याची धमकी दिल्याचे देखील समजते.