चला, षटकार ठोकूया! इंग्लंडपुढे ‘टीम इंडिया’चा विजयरथ रोखण्याचे आव्हान

>> मंगेश वरवडेकर

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये यजमान ‘टीम इंडिया’चा विजयरथ चौखूर उधळत आहे. लागोपाठच्या पाच विजयांमुळे या संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. इंग्लंडला हरविल्यास उपांत्य फेरी गाठण्याचा पहिला बहुमान ‘टीम इंडिया’ला मिळणार आहे. दुसरीकडे गत जगज्जेत्या इंग्लंडच्या संघाने पाचपैकी चार लढती गमावल्याने त्यांची जवळपास बॅगा भरण्याची वेळ समिप आली आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उद्या (दि. 29) इंग्लिश आर्मीपुढे ‘टीम इंडिया’चा विजयरथ रोखण्याचे आव्हान असेल.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर ‘टीम इंडिया’ खेळणार

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानने 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडला हरवून विजयाची पंचमी साजरी केली होती. आता आठवडाभराच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने होऊन हिंदुस्थानी खेळाडू लखनौच्या मैदानावर उतरतील. दुसरीकडे कागदावर सर्वात बलाढय़ वाटणाऱया इंग्लंड संघाची यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दाणादाण उडालीय. श्रीलंकेकडून पराभव झाल्याने निराश झालेल्या या संघाची आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यातच उद्याच्या लढतीत त्यांच्यापुढे सुपर फॉर्ममध्ये असलेल्या हिंदुस्थानी संघाचे आव्हान असेल.

रणरणत्या उन्हात सराव 

लखनौच्या मैदानावर हिंदुस्थानी संघाने बुधवारपासून वेगवेगळय़ा सत्रात कसून सराव करीत इंग्लंडविरुद्धच्या लढतीची जोरदार तयारी केली आहे. भरदुपारी दोन वाजता रणरणत्या उन्हात हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी सराव केला. उत्तर प्रदेशात ऑक्टोबर महिन्याची गरम आणि कोरडी हवा पसरू लागली आहे. सामन्यात खेळताना याच हवेचा सामना करावा लागणार असल्याने हिंदुस्थानी खेळाडू त्याचा अंदाज घेत सराव करताना दिसले. सरावादरम्यान लोकल बॉय मोहम्मद शमी हा दीर्घकाळ संवाद करताना दिसला.

इंग्लंडला झालंय तरी काय?

इंग्लंडकडे रथी-महारथी खेळाडूंनी सजलेला संघ आहे, मात्र वर्ल्ड कपच्या स्वारीवर आलेल्या या संघाला झालंय तरी काय? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलाय. वर्ल्ड कपमध्ये गॅसवर असलेल्या या संघाचे आव्हान टिकवून ठेवण्यासाठी जॉनी बेयरस्टो, जो रुट, बेन स्टोक्स, कर्णधार जोस बटलर यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करावी लागेल. खिस वोक्स, डेव्हिड विली, मोईन अली, आदिल रशीद या गोलंदाजी ताफ्यावरही बरेच काही अवलंबून असेल.

सूर्यकुमारला खेळविणार?

अष्टपैलू हार्दिक पंडय़ा जायबंदी असल्याने लखनौच्या लढतीत सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्यासाठी काढायचे कोणाला, हा यक्षप्रश्न कर्णधार रोहित शर्मा व संघ प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यापुढे असेल. कारण फिरकीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अष्टपैलू रविचंद्रन अश्विनचाही विचार होऊ शकतो. रोहित व विराट कोहली हे आजी-माजी कर्णधार वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असल्याने ‘टीम इंडिया’च्या मधल्या अन् तळाच्या फलंदाजांची अद्यापि उजळणी झालेली नाही. मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध 5 विकेट टिपल्याने त्याला बाहेर बसविण्याचे धाडस रोहित करणार नाही, मात्र अश्विन की सूर्यकुमार यापैकी कोणाला संधी मिळते, यासाठी उद्याचा दिवस वाट बघावी लागेल.