भुजबळांच्या माघारीनंतरही नाशिकचा तिढा कायम, भाजपने पुन्हा दावा केल्याने मिंध्यांची गोची

महायुतीत नाशिकच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर दूर झाला असे बोलले जात होते. परंतु तो आणखीनच वाढला आहे. कारण भुजबळांच्या माघारीनंतर या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा दावा केला आहे. परिणामी या जागेवर अद्यापही महायुतीला आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही.

नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे 28 दिवस हातात आहेत. अजित पवार गटाकडून नाशिकवर दावा सांगितला गेल्यानंतर मिंधे गट आणि भाजपाचे नेते आक्रमक झाले होते. त्यातच भाजपने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध केला होता. त्यामुळे नाशिक महायुतीत नेमके कोणाच्या हाताला लागणार याबद्दल चर्चा रंगली होती.

अजित पवार गटाने भुजबळांचे नाव पुढे केल्यानंतर मिंधे गट संतप्त झाला होता. गोडसेंनाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह मिंधे गटातील अनेक आमदारांनी धरला होता. उमेदवारच ठरत नसल्याचे कारण सांगत भुजबळांनी रिंगणातून माघार घेतली. त्याला तीन दिवस उलटले तरीही नाशिकचा उमेदवार जाहीर न झाल्याने महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच भुजबळांनी माघार घेतली असली तरी अजित पवार गटातील अन्य इच्छुकांनी नाशिकमधून लढवण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपमध्ये तर विद्यमान आमदारांनी उमेदवारीसाठी इच्छा दर्शवली आहे. त्यानंतरही उमेदवार कोण असेल याची शाश्वती अजूनही नाही.

भुजबळांनी माघार घेतली असली तरी अजित पवार गटातील अन्य इच्छुकांनी नाशिकमधून लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचवेळी भाजपचे आमदारही गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.