तणाव दूर करण्यासाठी सुदर्शन क्रिया

डॉ. अपर्णा बुधकर तणाव व्यवस्थापनेची जनजागृती करतात. तणाव दूर करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम सोबत सुदर्शन क्रिया आवश्यक आहे. सुदर्शन क्रियेचे महत्त्व आज जाणून घेऊया.

डॉ. अपर्णा बुधकर गेल्या 21 वर्षांपासून मुंबईच्या ‘जसलोक’ हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट अॅनेस्थेटिस्ट म्हणून काम करत आहेत. त्या ‘आर्ट ऑफ लिविंग हॅपीनेस’ या उपक्रमाद्वारे नियमितपणे तणाव व्यवस्थापनेसाठी सत्र घेतात. डॉक्टर, नर्स, जवान आणि विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापनाची माहिती आणि उपाय सांगतात.

‘तणाव व्यवस्थापन करताना ध्यान आणि प्राणायामासोबत सुदर्शन क्रिया महत्त्वाचा इलाज आहे. सुदर्शन क्रिया हे लयबध्द श्वासोच्छ्वास करण्याचे तंत्र आहे. सुदर्शन क्रियेमुळे, ताणतणाव, थकवा नाहीसा तर होतोच, पण त्याबरोबर राग, वैफल्य, नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनासुद्धा नष्ट होतात. मन शांत आणि एकाग्र बनते. शरीरात चैतन्य सळसळायला लागते, शारीरिक स्तरावर विश्रांती मिळते,’ असे डॉ. अपर्णा बुधकर यांनी सांगितले.

डॉ. बुधकर यांनी ‘आर्ट ऑफ लिविंग हॅपीनेस’च्या सत्रामध्ये सुदर्शन क्रियेची माहिती घेतली. सुदर्शन क्रियेमुळे त्यांचे आयुष्य बदलले. त्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱयांना ऑनलाइन मेडीटेशन वर्कशॉप, हॅपीनेस प्रोग्राम, सेशन्सद्वारे तणावमुक्तीचा उपाय सांगतात.

शरीरासाठी आणि मनासाठी वेगवेगळे नियम आहेत. शरीर तंदुरुस्त होण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, परंतु मन शांत होण्यासाठी आराम आवश्यक आहे. ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज ध्यान आणि श्वासोच्छ्वासाच्या तंत्रांचा सराव करणे.

‘डॉक्टर, नर्स यांनी तणाव व्यवस्थापनाबद्दल शिकणे खूप गरजेचे आहे. रुग्णांच्या सुरळीत आणि सुरक्षित व्यवस्थापनासाठी टीमवर्क महत्त्वाचे असल्याने, सहकाऱयांच्या संवादाच्या समस्यांमुळे रुग्ण व्यवस्थापन तणावपूर्ण बनू शकते.’
– डॉ. अपर्णा बुधकर
प्रगती करंबेळकर