Leopard Attack : खड्यांमुळे बिबट्याच्या तावडीतून शिक्षक बचावला

>> जयेश शहा

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याबरोबरच रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या-मोठ्या खड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या खड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, रस्त्याच्या कडेच्या – खड्यामुळे बिबट्याच्या तावडीतून एका शिक्षकाचे प्राण वाचले.

ज्ञानेश्वर बाळू लोखंडे (रा. वळती, ता. आंबेगाव) असे बिबट्याच्या तावडीतून बचावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. वळती येथील लोंढे वस्तीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून चाललेल्या शिक्षकावर हल्ला केला. परंतु, रस्त्यात खड्डा आल्याने बिबट्याला हल्ला करता आला नाही. त्यामुळे लोखंडे शिक्षक बचावले. ही घटना शनिवारी (दि. 25) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लोंढे मळा, वळती परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वळती ते शिंगवे रस्त्यावर लोंढे मळा आहे. तेथे पुलानजीक कायम बिबट्यांचे वास्तव्य आहे.

शनिवारी (दि. 25) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर पुन्हा गवतामध्ये बिबट्या जाऊन लपला. यावेळी पाठीमागून आलेल्या पाच ते सहा दुचाकीस्वारांनी बिबट्याला पाहिले. त्यामुळे ते घाबरून जागेवरच थांबले होते. त्याचवेळी मंचरहून आपले काम आटोपून शिक्षक लोखंडे हे दुचाकीवरून घरी चालले होते. त्यांनी रस्त्यावर दुचाकीस्वार थांबलेले पाहिले. मात्र, त्यांना धोक्याचा अंदाज आला नाही. या दुचाकीस्वारांकडे विचारणा न करताच, लोखंडे यांनी गाडी तशीच पुढे नेली. त्यावेळी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडे यांनी प्रसंगावधान राखून गाडी जोरात पळवली. सुदैवाने रस्त्यात खड्डा आल्याने गाडी जोरात आदळली. त्यामुळे बिबट्याची पकड सुटली व लोखंडे बचावले. त्यांच्या पायावर बिबट्याचे दोन दात घुसले आहेत.

वळतीतील लोंढे वस्तीत पुलानजीक बिबट्याचे वास्तव्य आहे. अनेकांनी बिबट्याला पाहिले आहे. परंतु, आता बिबट्या वाहनांचा पाठलाग करू लागल्याने दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील रस्ते खणण्याचा प्रशासनाचा ‘उद्योग’ सुरूच आहे. रस्ता चांगला केला की, लगेच प्रशासनातर्फे जलवाहिनी, ड्रेनेज, महावितरणतर्फे केबल टाकण्यासाठी पुन्हा रस्ता खोदला जातो. पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी साचले की, खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन खड्ड्यात आदळून अनेक अपघात झाले आहेत.

यापूर्वीचे हल्ले

दि. 19 मार्च 2023
मंचर : दुचाकीवरून निघालेल्या तीन ऊसतोड कामगार आणि एका तीन वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सर्वजण जखमी झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रूक येथे ही घटना घडली.

दि. 30 मार्च 2023
मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब ते लौकी रस्त्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. जयश्री धोंडीबा भालेकर (वय ५५, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

दि. 30 मार्च 2024
मंचर : शेतीची कामे उरकून मुलासोबत दुचाकीवरून निघालेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात मयुरी विश्वासराव ही महिला जखमी झाली आहे.

दि. 22 मार्च 2024
मंचर : लांडेवाडी येथे बिबट्याने तीनजणांवर हल्ला केला. नितीन रामदास लांडे, विघ्नेश फदाले, सोमनाथ आढळराव हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले.