चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानची फिल्डिंग

गेल्या वर्षी आशिया चषकाचे यजमानपद मिळूनही पाकिस्तानला आयोजनाचा आनंद उपभोगता आला नव्हता. हिंदुस्थानच्या विरोधामुळे हिंदुस्थानचे सामने आणि स्पर्धेची बाद फेरी श्रीलंकेत आयोजित करावी लागली होती, मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आयसीसीकडे आतापासून फिल्डिंग लावली असून त्यांनी पाकिस्तानातील तीन शहरांची नावेही जाहीर केली आहेत. पुढच्या वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातच आयोजित करण्याचे पीसीबीचे स्वप्न असले तरी हिंदुस्थानी संघाच्या भूमिकेवर या स्पर्धेचे आयोजन अवलंबून आहे.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरात घेणार असल्याचे सांगत आयसीसीकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. आज एका पत्रकार परिषद घेत पीसीबीने याची घोषणा केली. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हिंदुस्थानचे सामनेही येथेच ठरले आहेत. मात्र, हिंदुस्थानी संघ पाकिस्तानमध्ये खेळणार का? हा सर्वात मोठा प्रश्न असेल. कारण आशिया चषक स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानलाच मिळाले होते, मात्र टीम इंडियाने तेथे खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला हिंदुस्थानचे सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागले. त्यामुळे यावेळीदेखील हिंदुस्थानी संघाच्या सामन्याचे आयोजन पाकिस्तानला तटस्थ ठिकाणीच करावे लागण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने 2008 मध्ये पाकिस्तानमध्ये अखेरची स्पर्धा खेळली होती, मात्र त्यानंतर पाकिस्तानी अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर हल्ला केला. त्यानंतर हिंदुस्थानी संघ कधीच पाकिस्तान दौऱयावर गेलेला नाही.

‘आम्ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीच्या पथकाने पाकिस्तानातील व्यवस्थेचा आढावा घेतला. आमच्यात एक सकारात्मक बैठकही झाली. शिवाय, आम्ही आयसीसीच्या सतत संपर्कात आहोत. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यशस्वी आयोजन करण्याचा आमचा निर्धार आहे.’

मोहसिन नकवी, पीसीबी अध्यक्ष