पालिकेची नर्सेस भरती निवडणुकीत रखडल्याने परिचारिका हवालदिल; पालिका म्हणते निवडणुकीनंतरच पुढील प्रक्रिया

मुंबई महानगरपालिकेत जानेवारीपासून सुरू झालेली 650 नर्सेसच्या भरतीची प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेमुळे रखडली आहे. त्यामुळे शेकडो उमेदवार परिचारिका निवड होऊनही नियुक्तीपत्र मिळत नसल्याने हवालदिल झाल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेत परिचारिकांच्या रिक्त जागांवर भरती करण्यासाठी जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये 650 परिचारिकांची भरती करण्यात येत आहे. मात्र निवड होऊनही मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने अचानक ही भरती स्थगित करण्यात आली. यामुळे निवड झालेल्या परिचारिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. यातच ही भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीने राबवण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी पालिकेची प्रमुख रुग्णालये असलेल्या केईम, शीव, कूपर, नायर रुग्णालय प्रशासनांनी पालिकेकडे ही भरती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. या पदांची नियुक्तीपत्रे दिली जात नसल्यामुळे ऑपरेशनसह इतर नियमित सेवांवर रिक्त पदांमुळे परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र यासाठी पालिकेने ही परवानगीच जिल्हाधिकाऱयांकडे मागितली गेली नसल्याने उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे.

पालिका म्हणते

या भरतीमध्ये निवड झालेल्या शेकडो जणांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत. यातील मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण झालेल्यांनी डय़ुटी जॉइनही केली आहे. मात्र आचारसंहिता नियमानुसार या काळात नियुक्तीपत्रे देण्यात येत नसल्याने ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगिती दिली असली तरी ही प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.