…म्हणून अनिल देशमुखांवर शंभर कोटी वसुलीचा आरोप

कार्यकाल संपत असताना 2019मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास दौरा असल्याचा दावा करून 8 ते 9 अधिकाऱयांना बेकायशीरपणे इस्राईलला पाठवले. मात्र माहिती-तंत्रज्ञानाचा गैरवापर करून निवडणुका कशा जिंकायच्या हे समजून घेण्यासाठी हे अधिकारी गेल्याचे इस्त्राईलने दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे. ही माहिती तत्कालीन गृह मंत्री अनिल देशमुख यांना मिळाली होती. देशमुख हे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याने त्यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप भाजपने लावले, असा दावा कायदेतज्ञ, निर्भय बनो अभियानाचे प्रवर्तक अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

या वेळी कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, सीए प्रसाद झावरे, सुभाष थोरवे, धनंजय बिबाले आदी उपस्थित होते.

अॅड. सरोदे म्हणाले, सर्वेच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदा ठरवले असताना 21 फेब्रुवारी रोजी नाशिक सिक्युरिटी प्रेसने 1 हजार कोटींचे निवडणूक रोखे छापल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आम्ही सिक्युरिटी प्रेसला नोटीस पाठवली आहे. निकालानंतर छापलेल्या बॉण्डची जीएसटी भरल्याचेही समोर आले आहे, मात्र ते बॉण्ड नेमके कुणी घेतले, कोणत्या पक्षाला दिले यांची माहिती प्रेसने दिली नाही. बेकायदा निवडणूक रोखे छपाई प्रकरणाची माहिती आपण सर्वेच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्राद्वारे कळवणार असून ते पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करता येईल का याचा न्यायाधीशांनी विचार करावा, अशी विनंती करणार असल्याचेही सरोदे म्हणाले.