पंतप्रधान म्हणून मोदी यांचे यंदा अखेरचे ध्वजारोहण! लालू प्रसाद यादव यांची टीका

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी स्वातंत्रदिनी ध्वजारोहण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान म्हणून मोदी यांचे हे अखेरचे ध्वजारोहण असेल असे यादव यांनी म्हटले आहे. लालू यांनी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्यासह स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा केला. या दोघांनी ध्वजारोहण करत त्याला वंदन केले. यावेळी बोलताना लालू म्हणाले की, “मी देशवासीयांना या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मौलाना यांसारख्या महापुरुषांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो. अबुल कलाम आझाद आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान देश कधीही विसरु शकत नाही”

अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीत भाजपच्या विरोधात ठामपणे उभ्या राहिलेल्या लालू प्रसाद यादव यांना काही पत्रकारांनी विचारले की पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी तिरंगा फडकवू शकतील का ? “ नही , ना! (नाही, अजिबात नाही)” हे लालू यांचे त्या प्रश्नाला उत्तर होते. लालू यांच्याकडून खमंग बातमी मिळेल या उद्देशाने पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की, पुढच्या वर्षी काय परिस्थिती असेल. या प्रश्नाच्या उत्तरात लालू यांचा पंतप्रधानपदासाठी पाठिंबा कोणाला असेल हे कळू शकेल असं पत्रकारांना वाटत होतं, मात्र त्यांची निराशा झाली.