चिकन तंदुरीच्या पैशांवरून दोघांवर प्राणघातक हल्ला

चिकन तंदुरीचे पैसे देण्याच्या कारणावरून झालेला वाद दोघा तरुणांना महागात पडला. चिकन दुकादाराने अन्य चौघांच्या सहाय्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत इम्मान खान हा ए-1 चिकन सेंटर तसेच ठाण्यातल्या किसन नगरात चिकनचे दुकान चालवतो. अक्षय नार्वेकर, आकाश साबळे यांनी चिकन तंदुरी घेतली होती. त्याचे पैसे तेव्हा दोघांनी दिले नव्हते. मात्र नंतर दोघांनी ऑनलाईन 200 रुपये भरले. पण पैशांवरून इम्रान आणि दोघांमध्ये वाद झाला होता. दरम्यान, इम्रान व सलीम खान यांनी रविवारी रात्री अक्षय आणि आकाशला मुलुंडमधील त्याच्या दुकानावर बोलावले. शिवाय अब्दुल, फारुख आणि नौशाद अली या भावांनादेखील तिथे बोलावले. अक्षय व आकाश तेथे रात्री साडेनऊच्या सुमारास गेले असता पुन्हा तेथे वाद झाला. त्या वेळी अब्दुलने दोघांवर चाकूने वार केले. तर फारूख व नौशादने दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात अक्षयचा मृत्यू झाला. तर आकाश गंभीर जखमी झाला. आकाशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा प्रकार कळताच मुलुंड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इम्रान, सलीम तसेच अब्दुल, फारुख आणि नौशादला अटक केली.