पंतप्रधान पाण्याच्या तळाशी जातात पण मणिपूरला जात नाहीत, उद्धव ठाकरेंचा घणाघात

गेला काही काळ मणिपूर पेटलेलं आहे. जाती जमातींमध्ये आगडोंब उसळलेला आहे. पण पंतप्रधान किंवा गृहमंत्री कुणीही तिथे जायला तयार नाहीत. पंतप्रधान पाण्याच्या तळाशी जातात पण मणिपूरला जात नाहीत. महाराष्ट्रात मत मागायला येतात पण मणिपूरमध्ये जात नाहीत? का मणिपूरमध्ये हिंदू राहत नाहीत का? हे सगळं देश नासवणारं राजकारण आहे. हा भाडोत्री जनता पक्ष आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला.

यवतमाळच्या पुसद येथील सभेत बोलताना त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, 2024ला मी शहाणा झालो, तुम्ही झालात की नाही? कारण आजपर्यंत ज्यांना पंतप्रधान करायला मत मागायला आलो होतो. त्यांनी पंतप्रधान व्हावं म्हणून ज्यांना मतदान करा म्हणून सांगायला हवं आलो होतो, आज त्यांना खुर्चीवरून खाली खेचा हे सांगायला आलो आहे. पुसदचा उल्लेख केल्यानंतर वसंतरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी लहान होतो. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, नवीन पिढीला कल्पना नसेल पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव यांचे खूप घट्ट ऋणानुबंध, स्नेहसंबंध होते. 1 जुलै या वसंतरावांच्या जन्मदिवशी वर्षा बंगल्यावर शुभेच्छा द्यायला जात होतो. असे आमचे आणि नाईक कुटुंबाचे संबंध होते. पण हा समाज त्यानंतर सलग शिवसेनेसोबत राहिला आहे. याचा मला अभिमान आहे, वसंतरावांनाही अभिमान वाटत असेल. एका सत्याच्या बाजूने माझा समाज उभा राहिला आहे, याचा. बोलण्यासारखं खूप आहे, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या व्यथा आहेत. मी बोलेन पण तुम्ही त्या भोगता आहात. आधीच्या सभेत सांगितलं कारण हल्लीच माननीय पंतप्रधान यवतमाळमध्ये येऊन गेले. आम्ही मुंबईत पेपरमध्ये वाचलं की 2014मध्ये आणि 2019मध्येही ते आले होते, असं म्हणतात. कारण त्यांना कुणीतरी सांगितलंय की यवतमाळमध्ये सभा घेतली तर तुम्ही यशस्वी व्हाल. याचा अर्थ तुम्हाला कळला? याचा अर्थ असा की तुमचं नशीब त्यांच्या हातात नाही, त्यांचं नशीब तुमच्या हातात आहे. दहा वर्षं जुमले बघितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता एवढी भोळीभाबडी नाहीये की तुम्ही थापा मारायच्या, विश्वासघात करायचा, दगाबाजी करायची. निवडणूक आली की भीक दिल्यासारखं काहीतरी फेकून द्यायचं की पुन्हा तुमच्या पालख्या वाहायला तयार. नाही. यावेळी माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रातला एकही सैनिक भाजपची पालखी वाहणार नाही. त्यांना पालखीतून खाली खेचू आणि कडवट देशाभिमानी पक्षाला त्यात बसवून इंडिया आघाडीचा पंतप्रधान दिल्लीच्या तख्तावर बसवू, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

भाजपच्या ढोंगी राजकारणावर आसूड ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हालाही असं वाटलं होतं की जे काही चाललं होतं, तेव्हा त्यावर उत्तर म्हणून मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे. कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, 2014ला भाजपलाही आत्मविश्वास नव्हता की निवडून येतील की नाही. पण 30 वर्षांनंतर देशात आपल्या देशात एका पक्षाचं सरकार दिल्लीत आलं होतं. मलाही अभिमान वाटला, मीही शपथविधीला दिल्लीत गेलो होतो. 2019मध्ये आणखी पुढे गेले, त्याचा आणखी अभिमान वाटला. पण, लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती. मधल्या काळात ती त्यांनी तोडली होती. आज जे भाजपचे लोक बेंबीच्या देठापासून ओरडून सांगताहेत की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. पण हिंदुत्व न सोडताही मुस्लीम समाज माझ्यासोबत येतोय. कारण, मी भाजपला सोडलं. भाजपचं नासलेलं, बुरसटलेलं हिंदुत्व सोडलं. आमचं जे खरं, शिवसेनेचं हिंदुत्व जे मला माझ्या आजोबांनी शिकवलं, जे मला शिवसेनाप्रमुखांनी मला शिकवलं, ते हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे, भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. आमच्या मनात राम आहे, पण हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

फोडा आणि राज्य करा या भाजपच्या नीतीवरही त्यांनी कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, कालपासून सीएए हा कायदा देशात लागू झाला आहे. म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर जे कुणी भयभीत हिंदू, जैन, पारशी, शीख त्यांना आपल्या देशात येऊ द्या. पण हा सुद्धा निवडणुकीचा जुमला आहे. कारण आता दोन तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल. जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हाही हे भूत त्यांनी आपल्या देशात नाचवलं होतं. एक भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली होती. खासकरून आसाममध्ये निर्माण झाली होती. आमच्या राहण्याचं सर्टिफिकेट नसेल तर आमचं काय होणार, असा काहीतरी तो विचित्र कायदा होता. त्याचवेळी याच कायद्याविरुद्ध काही याचिका कोर्टात दाखल झाल्या. त्यांच्यावर अजून निकाल लागला नाही, तोच त्यांनी सीएएची अधिसूचना जाहीर केली आहे. हा निवडणुकीचा जुमला आहे. यांना फक्त धर्मांत भेद करायचा आहे, मारामारी करायची आहे, दंगली पेटवायच्या आहेत. उद्याची जी निवडणूक होणार आहे. एकिकडे भाजप धर्माधर्मांत द्वेष पसरवतो आहे, घटनाबदल करू इच्छितो आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी ही देशभक्तांची आघाडी आहे. ही निवडणूक देशभक्त आणि द्वेषभक्त अशी होणार आहे. सांगा तुम्ही कोणाच्या बाजूला आहात? कारण यांच्याविरोधात कुणी बोललं की लगेच देशद्रोही म्हटलं जातं. नाही. आम्ही देशभक्त आहोत. जर बाहेरच्या देशातल्या हिंदूंना तुम्ही देशात घेत असाल तर जरूर घ्या. पण कश्मीरचं 370 कलम काढलं, त्याला आम्हीही पाठिंबा दिला होता. कश्मीरमध्ये जेव्हा कश्मिरी पंडित घर सोडून बाहेर पडत होते, विस्थापित होते. तेव्हा संपूर्ण देशात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात या, मी तुम्हाला घर देतो, मी तु्मच्या शिक्षणाची सोय करतो. तेव्हा कुठे होता सीएए.? अजूनही कश्मिरी पंडित विस्थापित आहेत. त्यांना कश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षित तुम्ही नेऊन दाखवा आणि मग या गोष्टी करा, असं रोखठोक आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.

मणिपूरच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भाजप आणि मोदींवर त्यांनी टीकास्त्र सोडलं. ‘मणिपूर पेटलेलं आहे, मणिपूरमध्ये काय हिंदू राहत नाहीत? जाती जमातींमध्ये जो काही आगडोंब उसळलेला आहे. पण पंतप्रधान जायला तयार नाहीत, नाही गृहमंत्री. पंतप्रधान पाण्याच्या तळाशी जातात पण मणिपूरला जात नाहीत. महाराष्ट्रात मत मागायला येतात पण मणिपूरमध्ये जात नाहीत? का ते हिंदू नाहीत का? हे सगळं देश नासवणारं राजकारण आहे. हा भाडोत्री जनता पक्ष आहे.’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.