श्रीकांत शिंदेंनी फक्त रिमॉडलिंगचे बोर्ड लावले, केले मात्र काहीच नाही; वैशाली दरेकर यांचा आरोप

श्रीकांत शिंदे खासदार म्हणून फेल आहेत. त्यांनी जी काही कामे केली आहेत ती राज्य शासनाच्या निधीतून केली आहेत. त्यांनी रेल्वेच्या रिमॉडलिंगचे फलक लावले आहेत. प्रत्यक्ष काम मात्र काहीच केले नाही. फक्त शोबाजी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर- राणे यांनी केले. कल्याण पूर्वेतील रिक्षाचालकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

कल्याण पूर्वेतील रिक्षाचालक-मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांशी आज वैशाली दरेकर यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांनी जी काही कामे केली आहेत ती खासदार निधीतून नव्हे तर बहुतांशी कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली आहेत. कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा या भागातून रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळते. परंतु त्याबदल्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात खासदार फेल गेले आहेत. भविष्यात रिमॉडलिंगची कामे करण्याचे फलक झळकवण्यात आले. परंतु यापैकी काहीही होणार नसल्याचा दावा दरेकर यांनी यावेळी केला.

यावेळी माजी महापौर रमेश जाधव, कार्याध्यक्ष दिलीप जाधव, अध्यक्ष शशिकांत चव्हाण, सरचिटणीस नितीन मोकल, कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, नारायण पाटील, मीना माळवे, हेमंत चौधरी यांच्यासह रिक्षाचालक-मालक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.