अफगाणिस्तानने केली जगज्जेत्या इंग्लंडची शिकार, वर्ल्ड कपमध्ये आठ वर्षांनंतर साकारला विजय

आम्हाला ‘डार्क हॉर्स’ का म्हणतात हे अफगाणिस्तान क्रिकेट संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र, यावेळी त्यांनी वर्ल्ड कपसारख्या मोठय़ा मंचावर रविवारी गत जगज्जेत्या इंग्लंडचीच शिकार केली. रहमानुल्लाह गुरबाझचे वादळी अर्धशतक, इक्रम अलिखिलची अर्धशतकी साथ आणि त्यानंतर सर्वच गोलंदाजांनी केलेल्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा संस्मरणीय विजय साकारला. 3 विकेट टिपत इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडणारा मुजीब उर रहमान ‘सामनावीर’ ठरला. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अफगाणिस्ताने वर्ल्ड कपमधील दुसरा विजय साकारला, हे विशेष.

अफगाणिस्तानकडून मिळालेल्या 285 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावसंख्येवरच गारद झाला. अफगाणिस्तानने 57 चेंडू राखून आणि 69 धावांनी हा संस्मरणीय विजय साकारला. इंग्लंडकडून हॅरी ब्रुक (66 धावा) हा अर्धशतकी खेळी करणारा एकमेव फलंदाज ठरला. याचबरोबर सलामीवीर डेव्हिड मलान (32) व आदिल राशीद (20) हे इतर धावांची विशी गाठणारे फलंदाज ठरले. जॉनी बेयरस्टॉ (2), जो रुट (11), कर्णधार जोस बटलर (9), सॅम कुरन (10) व ख्रिस वोक्स (9) हे रथी-महारथी फलंदाज अफगाणिस्तानच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीपुढे अपयशी ठरले. तळाला आदिल राशीद, मार्क वूड (18) व रिस टोपली (नाबाद 15) यांनी काही वेळ अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला म्हणून इंग्लंडला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान व राशीद खान यांनी 3-3 गडी टिपले. मोहम्मद नबीने 2 फलंदाज बाद केले, तर फजलहक फारुखी व नवीन उल-हक यांना 1-1 विकेट मिळाली.

त्याआधी जोस बटलरने टॉस जिंकून अफगाणींना फलंदाजी दिली. खेळपट्टीचा फायदा उचलण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला, पण रहमानुल्लाह गुरबाझच्या झंझावाताने इंग्लंडचा अपेक्षाभंग केला. गुरबाझने इब्राहिम झदरानसह 114 धावांची दणदणीत सलामी दिली. या भागीत इब्राहिमचा वाटा 28 धावांचाच होता. पण ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडला फटके देणाऱ्या अफगाणिस्तानला धक्के बसायला सुरुवात झाली. रहमानुल्लाहचा झंझावात 57 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकार खेचल्यानंतर 80 धावांवर शांत झाला.

बिनबाद 114 वरून 3 बाद 122 अशी स्थिती झाल्यानंतर अफगाणी संघाला इकरम अलीखिलने बळ दिले. त्याने राशीद खानबरोबर 43 तर मुजीबूर रहमानसह 44 धावांची भागी रचत संघाला 277 धावांपर्यंत नेले. इकरमने 3चौकार आणि 2 षटकार ठोकत 58 धावा केल्या. अफगाणी फलंदाजांना रोखण्यात इंग्लिश गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.

अफगाणिस्तानचा वर्ल्ड कपमधील दुसरा विजय

अफगाणिस्तानने 2015 मधील पदार्पणाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडचा पराभव करून पहिला विजय साकारत इतिहास घडविला होता. त्यानंतर वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयासाठी त्यांना तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये या संघाने चक्क जगज्जेत्या इंग्लंडला धूळ चारण्याचा पराक्रम करून दाखविला.

इंग्लंडचा पाचवा धक्कादायक पराभव

इंग्लंडच्या संघाला क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात पाचव्यांदा उलटफेरचा धक्का बसलाय. याआधी, 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने त्यांना 9 धावांनी हरविले होते. त्यानंतर 2011च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला आधी आयर्लंडने 3 गडी राखून, तर नंतर बांगलादेशने 2 गडी राखून पराभूत केले. 2015च्या वर्ल्ड कपमध्येही बांगलादेशनेच इंग्लंडला 15 धावांनी पराभवा धक्का दिला होता. यावेळी अफगाणिस्तानने त्यांना हरविण्याची किमया करून दाखविली. एवढेच नव्हे, तर टी-20 वर्ल्ड कपमध्येही नेदरलॅण्ड्ससारख्या दुबळय़ा संघाने इंग्लंडला दोन वेळा हरविण्याचा पराक्रम केलेला आहे.