यवतमाळ जिल्ह्यात वादळाचा तडाखा, अनेक घरांची पत्रे उडाले; भिंत कोसळून सहा जण जखमी

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा मोठा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील आर्णी, महागाव तसेच पुसद तालुक्यात वादळीवार्‍यामुळे नुकसान झाले असून अनेक घरावरील टिनपत्रे उडाले आहे. टिनपत्रे उडाल्याने एकाचा हात कापला गेला असून इतर दोघे गंभीर जखमी आहे. अचानक झालेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आर्णी तालुक्यातील पाभळ येथील जवळपास पंचवीस ते तीस घरांची पडझड झाली असून अनेक घरावरील टिनपत्रे उडाले आहेत. अनेक ठिकाणाची झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला. तसेच महागाव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना फटका बसला. घराची पडझड झाल्याने अनिता भारत जाधव यांच्या कमरेला मार लागला. समाधान भुरके याचा हात कापला गेला असून हिरासिंग पाटील जखमी आहे.

वादळामुळे पाभळ रस्ता झाला असून विद्युत खांबावरील तारा तुटून पडल्या आहे. वादळामुळे पुसद तालुक्यातील वसंतनगर येथे निर्माणधीन भिंत घरावर कोसळल्याने सहा जण जखमी झाले आहे. त्यांचेवर पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.महागाव तालुक्यात तिवरंग, मलकापूर चिखली, दहिसावळी, पोहंडुळ आणि थार परिसराला चक्रीवादळासारख्या सोसाट्याच्या वार्‍याने अक्षरशः झोडपून काढले आहे . अनेक घरांची पडझड झाली असून फळ बागांचेही नुकसान झाले आहे . सोसाट्याच्या चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्याजिल्ह्यातील आपदग्रस्त कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करावे व प्रशासनाने सहानुग्रह मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी केली आहे.