चार महिलांनी प्रवासात चोरले चक्क सोन्याचे घड्याळ, हातात पडल्या बेड्या

>> प्रसाद नायगावकर

एस टी मध्ये चढताना एखादी सुखवस्तू दिसणारी महिला हेरायची, त्या महिलेच्या आजूबाजूने गर्दी करून त्या महिलेच्या पर्स मधील किमती माल लंपास करायच्या . असा गोरखधंदा गेल्या कित्येक दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अव्याहत सुरू आहे . नागरिक या घटनांमुळे त्रस्त झाले होते . अशातच यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड येथील पोलिसांनी अशीच महिलांची टोळी जेरबंद केल्याने अशा अनेक चोरीच्या घटना उघडकीस येतील असा पोलिसांना विश्वास आहे . या महिला टोळीकडून पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे एक सोन्याचे लिमिटेड एडिशन घड्याळ जब्त केले आहे .

दिग्रस वरून एक महिला लक्ष्मी ( बदललेले नाव ) ह्या यवतमाळ येथे येण्यासाठी एसटीत बसल्या. नेमके हेच हेरून एसटीत चार महिलांनी तिच्याभोवती घेराव करून त्यांच्या पर्समधील सोन्याचे घड्याळ मारले. पण नेमके गर्दीमुळे या महिला चोरांना लगेच उतरण्याची संधी न मिळाल्याने याच एस टी ने प्रवास करावाच लागला . रस्त्यात लक्ष्मी यांना प्रवास दरम्यान तहान लागल्याने पाण्याची बाटली काढण्यासाठी त्यांनी पर्स उघडली .तेंव्हा घड्याळ ठेवलेली छोटी पर्स त्यांना लंपास झाल्याचे त्यांना लक्षात आले . ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला . यातच एका जागरूक नागरिकाने त्वरित लाडखेड पोलीस स्थानकाचे ठाणेदार विशाल हिवरकर यांना फोन केला . घटनेचे गांभीर्य ओळखताच महिला शिपायांसोबत या एस टी बसला वाटेतच गाठत ही बस थांबविली .त्यामुळे या महिला चोरांना कोणत्याच बस थांब्यावर उतरण्याची संधी मिळाली नाही.

यावेळी लाडखेड पोलीस टीमने चार महिला संशयितांना अटक केली . पोलीस स्थानकात आणून त्यांची अंगझडती घेतली असताना टायटन कंपनीचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे एक सोन्याचे लिमिटेड एडिशन वॉच जब्त केले आहे .या वेळी चार महिला चोरांना पोलिसांनी अटक केली आहे . यातील दोन महिलांवर यवतमाळ पोलीस स्थानकात अशेच चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे ठाणेदार विशाल हिवरकर यांनी सांगितले . अधिक तपास केल्यास या महिलांकडून या प्रकारच्या चोरीचे अनेकगुन्हे उघडकीस येतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला . आता या चोर महिलांच्या हाती सोन्याचे घड्याळ लागले . पण हा त्यांचा आनंद औटघटकेचा ठरला . हातात घड्याळ पडण्या पडण्या ऐवजी पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत.

सदर प्रकरणाची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री पवन बन्सोड, मा. अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप व मा सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चिलुमूला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक विशाल हिवरकर, प्रेम राठोड, उमेश चंदन, नितीन सलाम, उमेश शर्मा, विठठल कोपनर,शुभांगी ठाकरे, पुजा ठाकरे, आतिष कोकाटे, जयंत शेन्डे यांनी केला आहे.