सोलापुरात महाविकास आघाडीचे भव्य शक्तिप्रदर्शन, रॅली; प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज भव्य शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दाखल केला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, पंढरपूरचे भारत भालके, प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह मोठय़ा संख्येने सोलापूरकर उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता काँग्रेस भवनासमोर महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माकप, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी हे सर्व आमच्यासोबत आहेत. ही माझ्या एकटीची लढाई नाही. तुमच्या सर्वांची लढाई आहे. मी लढायला चालले आहे. त्यामुळे तुमची साथ मिळणे गरजेचे आहे. आपल्याला सोलापूरचा विकास करायचा आहे. भाजपचे दोन्ही खासदार निक्रिय ठरले. यावेळी प्रचारामध्ये या दोन्ही खासदारांना घेऊन फिरायला त्यांना लाज वाटते का?’, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.

‘माझे वडील खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत राहतात. आपल्या सर्वांचा शत्रू एकच आहे तो म्हणजे भाजप. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. यांनी गेल्या 10 वर्षांत सोलापूरचे मोठे नुकसान केले आहे. त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. मी सोलापूरची लेक असून, शेवटच्या श्वासापर्यंत काम करीत राहीन,’ असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी दिला.

रे-नगर घरकुलचे श्रेय घेऊ नका, असे भाजपला ठणकावत माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम म्हणाले, ‘रे-नगर घरकुल योजनेसाठी आम्ही रक्ताचे पाणी करून झटत आहोत. आणि ते आम्ही घरकुल मंजूर केले, असे सांगत सुटले आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात या योजनेला गती मिळाली. 2013 साली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या योजनेला सहकार्य केले. याची आठवणही नरसय्या आडम यांनी करून दिली. भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून दिला का,’ असा संतप्त सवालही नरसय्या आडम यांनी केला.

जाहीर सभेनंतर वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत राम, सीता, हनुमान यांची वेशभूषा करून नागरिक सहभागी झाले होते. तसेच विविध पक्षाचे झेंडे घेऊन हजारो लोक सहभागी झाले होते. काँग्रेस भवन, जिल्हा न्यायालय, जगदंबा चौक मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. या रॅलीत ग्रामीण भागातून महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सामील झाले होते.

रॅलीत माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, विश्वनाथ चाकोते, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, उपनेते शरद कोळी, जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, अमर पाटील, यू. एन. बेरीया, भारत जाधव, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष पाटील, निखिल किरनाळे, समाजवादी पार्टीचे अब्बु तालीब डोंगरे, बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे यांच्यासह पदाधिकारी रॅलीत सामील झाले होते.