वेब न्यूज – क्लिपर मिशन

>> स्पायडरमॅन

अमेरिकेची अंतरीक्ष संस्था नासा ही सतत नवे संशोधन करण्यात, अंतराळ मोहिमा आखण्यात गुंतलेली असते. या वेळी नासा राबवत असलेली क्लिपर मिशन ही मोहीम हिंदुस्थानात चर्चेत आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मोहिमेत अंतराळयानाबरोबर नासा एक खास संदेश पाठवत आहे, जो हिंदीसह 103 भाषांमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. क्लिपर मिशनमध्ये पाठवला जाणारा हा संदेश मेटल टॅंटलमपासून बनवण्यात आलेल्या 6 बाय 11 इंचाच्या प्लेटवर कोरलेला आहे. या संदेशात हिंदीसह जगभरात बोलल्या जाणाऱया 103 भाषांमध्ये ‘पाणी’ हा शब्द रेकॉर्ड करण्यात आला आहे. हिंदीत त्याचा उच्चार ‘जल’ असा करण्यात आला आहे. बृहस्पतीचा चंद्र असलेल्या युरोपासाठी ही खास मोहीम आखण्यात आली आहे. संशोधकांना असा विश्वास आहे की, युरोपावरील बर्फाळ तळाच्या खाली एक महासागर अस्तित्वात आहे. त्यांच्याकडे तसा पुरावादेखील आहे. खरे तर संपूर्ण पृथ्वीवरील सर्व महासागरांमध्ये मिळून जेवढा पाणीसाठा आहे, त्याच्या दुप्पट पाणीसाठा युरोपावर आहे. त्यामुळेच त्याने जगभरातील अवकाश संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मोहिमेत युरोपावरील जलस्रोतांचा अभ्यास आणि जलस्रोतांमुळे तिथे काही जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याचा शोध घेतला जाणार आहे. या मोहिमेत खास संदेशासोबत अमेरिकन कवयित्री एडा लिमॉन यांच्या ‘इन प्रेझ ऑफ मिस्ट्री ः अ पोएम फॉर युरोपा’ या कवितेची कोरलेली प्रतदेखील पाठवण्यात येणार आहे. तसेच एक सिलिकॉन मायक्रोचिप स्टेन्सिलदेखील पाठवण्यात येणार आहे, ज्यात जगभरातील लोकांनी नोंदविलेल्या 2.6 लाख नावाची नोंद असणार आहे.