
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान दगड खाली आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पायरी मार्गावर आलेले दगड बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून याकरता लागणारा वेळ लक्षात घेता शिवभक्तांनी सद्यस्थितीमध्ये या मार्गावरून प्रवास करू नये असे आवाहन बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
येत्या शनिवारी 27 जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनांमुळे बांधकाम विभागाने या संदर्भात अधिक खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा शिवभक्त व स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.































































